belgaum

सर्पमित्र चिठ्ठी यांनी वाघवडे येथे एकाच ठिकाणी पकडले चार धामण

0
645
 belgaum

बेळगाव लाईव्ह :एखादा साप दिसला तरी आपली घाबरगुंडी उडते, परंतु वाघवडे येथे तर एकाच ठिकाणी तब्बल चार मोठे धामण जातीचे साप आढळून आल्याची घटना काल रविवारी सायंकाळी घडली. त्यामुळे कांही काळ घबराट पसरली होती, मात्र सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी चारही साप शिताफिने पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, वाघवडे (ता. जि बेळगाव) येथील काही जणांना काल रविवारी सायंकाळी गावातील रस्त्याशेजारील बांधा खाली झाडीमध्ये दोन मोठे साप आढळून आले. प्रसंगावधान राखत त्यांनी लागलीच सर्पमित्र आनंद चिट्टी यांच्याशी संपर्क साधून सापाबद्दल माहिती दिली.

माहिती मिळताच चिट्टी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही सापांना पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यावेळी उपस्थित त्यांनी त्या ठिकाणी आणखी काही साप असल्याची शंका व्यक्त केली.

 belgaum

तेंव्हा अंधार असूनही आनंद चिट्टी यांनी सुरुवातीला दिसलेल्या दोन सापांना पकडण्याबरोबरच झाडीमध्ये शोध घेऊन आणखी दोन सापांना शिताफिने पकडून आपल्याकडील पिशव्यांमध्ये सुरक्षितरीत्या बंद केले. दरम्यान त्या चार सापांच्या वावरामुळे संबंधित ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले होते. सर्पमित्र चिठ्ठी यांनी रात्री 8 -8:30 वाजण्याच्या सुमारास चारही सापांना महत्प्रयासाने पकडताच उपस्थित गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

साप पकडल्यानंतर त्यांच्याबद्दल माहिती देताना सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी पकडलेले साप हे धामण जातीचे असल्याचे सांगून चारही साप नर असावेत असा कयास व्यक्त केला. सध्या सापांचा मिलनाचा मोसम सुरू आहे. सापांपैकी नाग सापांचे मिलन हे बिळांमध्ये होत असते तथापि धामण वगैरेंसारख्या सापांचे मिलन जमिनीवर होत असते. एका मादी सापाच्या वासाने एकाहून अधिक साप मिलनासाठी बिळातून बाहेर पडत असतात. त्यामुळेच हे चार साप या एकाच ठिकाणी आढळून आले आहेत.

बेळगाव परिसरात धामण सापाचा वावर जास्त असला तरी या सापापासून कोणताही धोका नसतो हे लक्षात घेतले पाहिजे. मिलनाचा हंगाम असल्यामुळे येत्या मे -जूनपर्यंत हे साप आपल्याला सातत्याने दिसू शकतात अशी माहिती देऊन कोणत्याही सापाला पाहून घाबरण्याची गरज नाही त्याला जर आपण इजा केली नाही तर तो तुमच्या वाटेला जात नाही. तेंव्हा सापांना निष्कारण इजा पोचवू नये, असे आवाहन सर्पमित्र चिट्टी यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.