belgaum

मनपाच्या अनधिकृत कर वाढीविरोधात माजी नगरसेवक आक्रमक

0
200
 belgaum


बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि नियमबाह्य पद्धतीने लागू केलेली ३ टक्के मालमत्ता कर वाढ रद्द करण्यासाठी आज माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी महानगरपालिकेत धडक दिली. महापौर मंगेश पवार यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने या दरवाढीचा तीव्र निषेध केला आणि प्रशासकीय मनमानी कारभारावर ताशेरे ओढले.

महानगरपालिकेच्या मागील सभेत ज्या पद्धतीने ही कर वाढ मंजूर करण्यात आली, तो प्रकार लोकशाहीला घातक असल्याचे मत शिष्टमंडळाने व्यक्त केले. ही दरवाढ सर्वसामान्य बेळगावकर जनतेचे आर्थिक गणित कोलमडणारी असून प्रशासनाने तातडीने यात हस्तक्षेप करावा, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या संपूर्ण प्रकरणावर माजी नगरसेवक नागेश सातेरी यांनी प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवले. सभेच्या विषयपत्रिकेवर नसतानाही कर वाढीचा विषय घुसडणे हा सभागृहाचा अपमान आहे. केवळ महापौर किंवा स्थायी समितीला असलेले अधिकार डावलून कौन्सिल सेक्रेटींनी हा ठराव कसा मांडला, असा रोकडा सवाल नागेश सातेरी यांनी उपस्थित केला. दरवर्षी होणारी ही छुपी ३ टक्के कर वाढ जनतेवर अन्यायकारक असून पालिकेने आपली वसुलीची पद्धत सुधारावी, असे नागेश सातेरी यांनी म्हटले.

 belgaum

यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी शहराच्या इतर ज्वलंत समस्यांकडेही महापौरांचे लक्ष वेधले. शिष्टमंडळात नागेश सातेरी यांच्यासह माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, निवृत्त कर्मचारी अमरोळकर आणि दीपक सावंत यांचा सहभाग होता. जन्म-मृत्यू दाखल्यांबाबत लोकअदालतीने दिलेले आदेश महापालिकेने तातडीने लागू करावेत, अशी मागणीही या प्रसंगी लावून धरण्यात आली.

या गंभीर विषयावर तोडगा काढण्याचे आश्वासन महापौर मंगेश पवार यांनी दिले आहे. लोकभावना लक्षात घेऊन या कर वाढीबाबत फेरविचार केला जाईल आणि नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू, असे मंगेश पवार यांनी सांगितले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.