बेळगाव लाईव्ह : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात बेळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोठी तरतूद केली आहे. उद्योग, क्रीडा आणि सिंचन या तिन्ही क्षेत्रांत जिल्ह्याला झुकते माप देतानाच, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत देऊन दिलासा दिला आहे.
बेळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारने १,००० एकर क्षेत्रावर भव्य औद्योगिक पार्क उभारण्याची घोषणा केली आहे. यामुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कळसा-भांडुरा प्रकल्पाबाबत भाष्य करताना, केंद्र सरकारच्या वन विभागाची तांत्रिक मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, सुवर्णसौधमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी २० कोटींचे बॅरेक्स आणि यलगट्टी येथे नवीन पोलीस ठाणे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी बेळगुंदी येथे राष्ट्रीय दर्जाचा आधुनिक कुस्ती आखाडा उभारला जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातही जिल्ह्याला महत्त्वाचे स्थान मिळाले असून बेळगाव ग्रामीण व बैलहोंगल भागात नवीन निवासी शाळा आणि शासकीय महाविद्यालये प्रस्तावित आहेत. याशिवाय अथणी येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्याबाबत अहवाल मागवण्यात आला असून, अनुसूचित जाती-जमातीच्या नोकरी करणाऱ्या महिलांसाठी शहरात सुसज्ज वसतिगृहे बांधली जाणार आहेत.

सिंचन आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत रामदुर्ग, सौंदत्ती आणि अथणी तालुक्यातील तलाव भरण्याच्या योजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. संकेश्वर येथील रस्ते विकास आणि जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी विशेष निधी राखून ठेवला आहे. ‘सशक्त कर्नाटक’ मोहिमेअंतर्गत बेळगावला क्रीडा आणि शैक्षणिक केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत आहे.
शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी मुख्यमंत्र्यांनी ५६,४३२ रिक्त पदे भरण्याची मोठी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांमुळे रखडलेल्या भरती प्रक्रियेचा विचार करून वयोमर्यादा ५ वर्षांनी वाढवून दिली आहे. यासोबतच वन विभागातील २,००० पदांची भरती आणि महिला अतिथी अधिव्याख्यात्यांना ९० दिवसांची प्रसूती रजा लागू करण्याचा निर्णयही प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचा मानला जात आहे.





