बेळगाव लाईव्ह : पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा सर्वात प्रामाणिक मानला जातो रस्त्यावर अशा कुत्र्यांना खाऊ देत माणुसकी दाखवण्याचे काम दोन सैन्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी केली आहे.बेळगाव शहरातील काँग्रेस रोड, टिळकवाडी परिसरात (मिलिटरी महादेव मंदिरामागे) मंगळवारी ३ मार्च रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडलेली एक हृदयस्पर्शी घटना नागरिकांच्या मनाला स्पर्श करून गेली.
भारतीय सैन्य दलातून सेवा निवृत्त झालेले सुभेदार सुधाकर चाळके आणि मानद कॅप्टन उत्तम शिंदे हे दोघे मित्र आपल्या दुचाकीवरून जात असताना अचानक चार भटकी कुत्री त्यांच्या मागे भुंकत धावू लागली. साधारणपणे अशा प्रसंगी भीतीपोटी वाहनाचा वेग वाढवला जातो; मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांनी शांतपणे दुचाकी थांबवली. विशेष म्हणजे, त्यांनी थांबताच कुत्र्यांनीही भुंकणे बंद केले.
सुभेदार चाळके यांच्या गाडीत घरी नेण्यासाठी ठेवलेले बिस्किटांचे पाकीट होते. परिस्थिती ओळखून दोघांनीही त्या कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घातली. काही क्षणांतच आक्रमक वाटणारी ती कुत्री शांत आणि मैत्रीपूर्ण झाली.
यावेळी सुभेदार चालके म्हणाले, “सर्वच कुत्री इजा करण्यासाठी पाठलाग करत नाहीत; कधी कधी ती फक्त भुकेली असतात.”
भूक भागल्यानंतर ती कुत्री शांतपणे निघून गेली. दोन्ही माजी सैनिकांनाही मूक प्राण्यांची मदत केल्याचा समाधानाचा आनंद मिळाला. उपस्थित नागरिक आणि वाहनचालकांनी त्यांच्या या संवेदनशील व मानवी कृत्याचे कौतुक केले.

अनेकदा कुत्री पाठलाग करताच आपण घाबरून वाहनाचा वेग वाढवतो, ज्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. मात्र प्राण्यांच्या वर्तनाचा योग्य अंदाज घेत शांतपणे प्रतिसाद दिल्यास धोका टाळता येतो आणि माणुसकीही जपता येते.
ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते — कधी कधी दिसणारा आक्रमकपणा हा केवळ भुकेचा आविष्कार असतो.
लहानशी दयाळू कृतीही मोठा फरक घडवू शकते.





