बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील अनगोळ परिसरातील राजहंस गल्लीत धुलीवंदन उत्सवादरम्यान ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत लावल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने नवा वाद पेटला आहे. अर्जुन गोळ्याप्पा कांबळे याने या गीतामुळे कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकारामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून “केवळ मराठीवरच आक्षेप का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
३ मार्च रोजी राजहंस गल्लीत धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा झाला. गल्लीतील मराठी आणि कन्नड बांधवांनी एकत्र येत हिंदी, कन्नड आणि मराठी गाण्यांच्या तालावर सणाचा आनंद लुटला. कोणत्याही प्रकारचा वाद किंवा गोंधळ झाला नसताना केवळ भाषिक द्वेष पसरवण्याच्या हेतूने अर्जुन कांबळे याने तक्रार केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केल्याने मराठी समाजात अस्वस्थता पसरली आहे.
या अन्यायाविरुद्ध राजहंस गल्लीतील रहिवाशांनी आपली प्रखर भूमिका मांडली आहे. “कॉलेजांमध्ये पंजाबी भांगडा डान्स होतो, राजस्थानी लोक आपली लोकगीते लावतात, तेव्हा कोणाच्या भावना दुखावत नाहीत. मग केवळ मराठी गाण्यांवरच आक्षेप का घेतला जातो? उद्या हेच लोक राष्ट्रगीतातील ‘मराठा’ शब्दावरही आक्षेप घेतील का?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
“आम्ही कोणत्याही भारतीय भाषेचा द्वेष करत नाही, मात्र आमच्या मातृभाषेवर गदा आली तर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही इथले भूमिपुत्र असून शेवटच्या श्वासापर्यंत मराठी टिकवून ठेवू,” असा निर्धार अनगोळवासियांनी व्यक्त केला आहे.





