belgaum

‘व्हीटीयू’च्या २५ व्या दीक्षांत समारंभात ८,७०२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

0
199
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव मधील विश्वेश्वरैया तांत्रिक विद्यापीठाचा (व्हीटीयू) २५ वा वार्षिक दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात कर्नाटक नौदल तळाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर ॲडमिरल विक्रम मेनन आणि राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. देशाच्या सुरक्षेसाठी आणि तांत्रिक प्रगतीसाठी तरुणांनी सज्ज राहावे, असा संदेश या मान्यवरांनी यावेळी दिला. अभियांत्रिकी पदवीधरांनी आपले ज्ञान, शाश्वतता आणि लवचिकता या गुणांचा वापर करून राष्ट्रीय सज्जता बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन रिअर ॲडमिरल विक्रम मेनन यांनी केले.

विद्यापीठाच्या ‘ज्ञान संगम’ संकुलात आयोजित समारंभात बोलताना विक्रम मेनन म्हणाले की, इंजिनिअर्सनी विकसित केलेले नवीन तंत्रज्ञान हे मानवी समस्यांवर उपाय शोधणारे असावे. हवामान बदलापासून ते आरोग्य सेवेपर्यंत सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. केवळ नावीन्य शोधणे म्हणजे नेतृत्व नव्हे, तर नैतिक जबाबदारी आणि सांघिक कार्य महत्त्वाचे आहे. ‘व्हीटीयू’ने आपल्या अभ्यासक्रमात एआय, सायबर सुरक्षा आणि क्वांटम कॉम्प्युटिंगचा समावेश करून देशाला भविष्यासाठी सज्ज केले आहे. संरक्षण तंत्रज्ञानातील प्रस्तावीत एम.टेक अभ्यासक्रम कौशल्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतील. शिक्षण आणि संशोधनात सहकार्य वाढवण्यासाठी ‘व्हीटीयू’ आणि नौदल यांच्यात होणाऱ्या कराराला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे विक्रम मेनन यांनी नमूद केले.

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आपल्या भाषणात सर एम. विश्वेश्वरैया यांच्या दूरदृष्टीचे स्मरण करून तंत्रज्ञानाचा फायदा सामान्य जनतेला होणे आवश्यक असल्याचे सांगितले. माहिती तंत्रज्ञान आणि अंतराळ विज्ञानात कर्नाटक देशामध्ये आघाडीवर असून युवा पिढीने कठोर परिश्रम आणि कर्तव्य भावनेतून ‘विकसित भारत’ घडवण्याचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशात पालक आणि शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे सांगत सर्व पदवीधारकांचे अभिनंदन केले.

या दीक्षांत समारंभात एकूण ८,७०२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये ९६ गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि २५ सुवर्णपदक विजेत्यांचा समावेश होता. याप्रसंगी कुलगुरू प्रा. एस. विद्याशंकर, कुलसचिव प्रा. यु. जे. उज्वल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

उच्च शिक्षण विभागात लवकरच रिक्त असलेली २ हजार प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरली जातील, अशी घोषणा उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी. सुधाकर यांनी केली. यामध्ये सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्रनिकेतन मधील जागांचा समावेश असेल. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करत असल्याची माहिती डॉ. एम.सी. सुधाकर यांनी दिली.

विद्यापीठ तंत्रज्ञान स्वीकारण्यात आघाडीवर असून ४ हजार कंपन्यांशी सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांसाठी लवकरच ‘ओपन डे’ आयोजित केला जाणार असून प्लेसमेंटवर आमचा विशेष भर आहे, असे कुलगुरू प्रा. एस. विद्याशंकर यांनी सांगितले.

सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पार्वती सलेरा (४ सुवर्णपदके, एमबीए) हिने पदवी पूर्ण झाल्यावर मिळालेल्या नोकरीबद्दल आनंद व्यक्त केला. तर एच.सी. काव्या (३ सुवर्णपदके, एमसीए) हिने संशोधनात रस असल्याचे सांगितले. बी.एस. संचिता आणि व्ही. योगेश गौडा यांनी सुवर्णपदक मिळाल्याने समाधान व्यक्त करत सरकारी नोकरी आणि चांगल्या करिअरची इच्छा बोलून दाखवली. बी. राहुल डेव्हिड याने आपल्या वडिलांच्या प्रेरणेतून अभियांत्रिकी क्षेत्र निवडल्याचे नमूद केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.