बेळगाव लाईव्ह :दुग्ध उत्पादनातून गरिबांचा आर्थिकस्तर उंचावून त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून आता योग्य गरीब लाभार्थींना गाईंचे दान केले जात असून लवकरच हा उपक्रम बेळगाव भागात राबविला जाणार आहे, अशी माहिती रोटरी इंटरनॅशनलचे संचालक रो. के. पी. नागेश यांनी दिली.
बेळगाव शहरातील नर्तकी -स्वरूप चित्रपटगृहाच्या कार्यालयामध्ये आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. रोटरी इंटरनॅशनलच्या मान्यतेने रोटरी क्लबतर्फे सातत्याने विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जात असतात.
त्याचाच एक भाग म्हणून दुग्ध उत्पादनातून गरिबांचा आर्थिकस्तर उंचावून त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी योग्य लाभार्थींची निवड करून त्यांना गाई दान केल्या जात आहेत. यासाठी गो-दान हे पवित्र दान मानणाऱ्या मारवाडी व जैन समाजाचे आम्हाला सहकार्य लाभत आहे.

त्यांनी दिलेल्या गाई त्यांच्याच हस्ते आम्ही लाभार्थींना दान करतो. सध्या हा उपक्रम रामनगर, कोलार, तुमकुर, मंड्या व बेंगलोर जिल्ह्यांमध्ये यशस्वीरित्या राबवण्यात आला आहे. यामुळे लाभार्थी देखील आनंदीत झाले असून अनेकांचे संसार मार्गी लागले आहेत. आता सदर उपक्रम आम्ही उत्तर कर्नाटकात विशेष करून बेळगाव भागात राबविण्याचा निर्णय घेतला आहे, असे रोटरी इंटरनॅशनलचे संचालक रो. के. पी. नागेश यांनी पुढे स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेप्रसंगी प्रारंभी नर्तकी स्वरूप चित्रपटगृहाचे मालक व रोटरीचे माजी प्रांतपाल रो. अविनाश पोतदार यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच त्यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि शताब्दी साजरी करणाऱ्या बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे स्मृतिचिन्ह देऊन रो. के. पी. नागेश यांचा सत्कार केला. यावेळी रोटरी क्लब बेळगावचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.




