belgaum

काय आहे त्या बँक ऑफ बडोदा प्रकरणाची इन्साइड स्टोरी?

0
869
 belgaum


बेळगाव लाईव्ह विशेष :
कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे बँकांकडून इतर राज्यांत बदली करण्याचे धोरण आणि त्या त्या राज्यातील स्थानिक नागरिकांकडून “आमच्या राज्याची भाषा येत नसेल तर तुम्ही आमच्या राज्यात कामाला येऊ नका” अशा प्रकारच्या मागण्या व निदर्शने — या कचाट्यात अडकलेल्या बँक कर्मचाऱ्यांची व्यथा समजून घेण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.


बेळगावच्या उद्यमबाग येथील बँक ऑफ बडोदा शाखेत एका महिला बँक कर्मचाऱ्याला कन्नड भाषा बोलता येत नाही म्हणून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. संबंधित महिला कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.
यामधून कन्नड भाषेचा पुळका दाखवण्याचा प्रयत्न संबंधित कन्नड संघटनेने केला असला, तरी त्या महिला कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेचाही विचार आंदोलकांनी करणे गरजेचे होते. या घटनेची इन्साइड स्टोरी शोधण्याचा प्रयत्न केला असता, एका कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या आगाऊपणामुळे कन्नड संघटनेला हाताशी धरून संबंधित महिला कर्मचाऱ्यावर आघात करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तसेच संबंधित कारखानदारांनीही त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी एका नामवंत कंपनीतील कर्मचारी बँक ऑफ बडोदा, उद्यमबाग शाखेत गेला होता. त्याने घेतलेले कर्ज प्रकरण बंद करण्यासाठी तो बँकेत गेला असता, बँकेतील कर्मचाऱ्यांशी त्याने बातचीत केली. यावेळी संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, तो कर्मचारी म्हणाला की, “मी कन्नड भाषिक आहे, माझ्याशी कन्नडमध्ये बोला.”


त्यावेळी त्या महिला कर्मचाऱ्यांनी नम्रपणे सांगितले की, “मी परराज्यातील आहे, मला कन्नड येत नाही. मात्र आमचे कन्नड भाषिक कर्मचारी इतर ग्राहकांशी बोलत आहेत, आपण थोडा वेळ थांबा.” त्यानंतर तो कर्मचारी मॅनेजर कक्षात गेला. मॅनेजरनेही आपण परराज्यातील असून कन्नड येत नसल्याचे सांगून, थोडा वेळ थांबा, आम्ही तुमची समस्या सोडवू, असे आश्वासन दिले.
मात्र “कन्नड येत नसेल तर तुम्ही कर्नाटकात कसे कामाला आलात? तुम्ही इथून निघून जा,” अशा प्रकारचा आरडाओरडा त्या कारखान्यातील कर्मचाऱ्याने केला. त्यावेळी त्याला शांत करून परत पाठवण्यात आले.

बँकेने संबंधित कारखान्याच्या एचआर मॅनेजरला याची माहिती दिली. त्यानंतर मॅनेजरने त्या कर्मचाऱ्याला समज देत, बँकेत जाऊन असा गोंधळ घालणे चुकीचे असल्याचे सांगितले.
हा विषय कारखानदारांपर्यंत पोहोचल्याचे लक्षात येताच, त्या कर्मचाऱ्याचा राग उफाळून आला आणि त्याने काही कन्नड संघटनांतील आपल्या संपर्कांचा वापर करून मंगळवारी पुन्हा त्या बँकेसमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. यावेळी व्हिडिओ व्हायरल करण्यात आला.


संबंधित व्हिडिओ व्हायरल करताना एका महिला कर्मचाऱ्यावर आपण कशा प्रकारे मानसिक आघात करत आहोत, याचे भान कुणीही ठेवले नाही. भाषेच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या भावनिकतेचा आणि अगतिकतेचा विचार केला नाही, हा मुद्दा यामधून पुढे आला आहे.
या इन्साइड स्टोरीसोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे बँक कर्मचारी संघटनेने याविरोधात आता आवाज उठवण्याची गरज आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश अशा सर्वच राज्यांत बँका आपल्या कर्मचाऱ्यांना बदलीवर पाठवतात आणि त्यांना तेथील स्थानिक नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.


सध्या कर्नाटकात आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि इतर राज्यांतून आलेल्या कर्मचाऱ्यांनाही अशीच अडचण भेडसावत आहे. बदली करून बँकांचे वरिष्ठ अधिकारी मोकळे होतात, मात्र स्थानिक नागरिकांच्या रोषाला संबंधित बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनाच सामोरे जावे लागते.
उत्तर भारतातून आलेल्या कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा चांगली येत असल्यामुळे ते काही प्रमाणात समस्या सोडवू शकतात. मात्र दक्षिण भारतातून आलेल्या कर्मचाऱ्यांना हिंदी येत नाही आणि ग्राहकांना इंग्रजी येत नसल्यामुळे संवादाची मोठी अडचण निर्माण होते.
अशावेळी “तुम्हाला आमची भाषा येत नसताना आमच्या राज्यात का आलात?” असा सवाल करणाऱ्यांनी, प्रत्यक्षात त्या कर्मचाऱ्यांना परराज्यात नियुक्त करणाऱ्या बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची गरज आहे.


कन्नड संघटनांनी उपस्थित केलेला हाच प्रश्न, त्यांच्या राज्यातील कर्मचारी आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूसारख्या राज्यांत गेल्यावर त्यांनाही विचारला जाऊ शकतो, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. कारण त्या ठिकाणीही हिंदी भाषा चालत नाही आणि स्थानिक भाषेचा अभिमान प्रखर असतो.
आज अनेक राज्यांत अशा प्रकारच्या समस्या वारंवार उद्भवत असून, पोटापाण्यासाठी केलेली नोकरी मानसिक तणाव आणि सामाजिक आघाताचे कारण ठरत आहे. त्यामुळे आता बँक कर्मचाऱ्यांनी संघटित होऊन या प्रश्नावर ठोस आवाज उठवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.