बेळगाव लाईव्ह :भरधाव कारगाडीने धडक दिल्याने एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी सुवर्ण विधानसौध समोर पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घडली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नांव देवेंद्र चौगुले (रा. हालगा-बस्तवाड) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार गवंडी काम करणारे देवेंद्र हे आज सकाळी आपल्या दुचाकी (क्र. केए 22 ईए 6342) वरून बेळगावच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावर व्यवस्थित डाव्या अंगाने जाणाऱ्या देवेंद्र यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या एका भरधाव कार गाडीने धडक दिली.
या अपघातानंतर कारचालकाने न थांबता आपली कार सुसाट वेगाने बेळगावच्या दिशेला दामटली. त्यावेळी कारच्या ठोकरीने देवेंद्र आपल्या दुचाकीसह रस्त्याकडेला भिरकावले जाऊन गंभीरित्या जखमी झाले. सदर अपघाताची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
तसेच त्यांनी रुग्णवाहिका बोलावून घेतली. तसेच डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव होत असलेल्या अवस्थेत रस्त्याकडेला बेशुद्ध पडलेल्या देवेंद्र चौगुले यांना उपचारासाठी त्वरेने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार देवेंद्र यांना धडक देणारी एमएच 11 सीडब्ल्यू 9495 क्रमांकाची कार पुढे जाऊन गांधीनगर येथे रस्त्याकडेला थांबलेल्या एका कंटेनरला जाऊन आदळली. त्यामुळे कारच्या दर्शनीय भागाचा चक्काचूर झाला असून कार चालकाला किरकोळ दुखापत झाल्याची, तसेच त्याला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.




