belgaum

नामवंत क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांची बेळगाव भेट

0
105
 belgaum

बेळगाव लाईव्ह :द्रोणाचार्य पुरस्कार विजेते मुंबईचे नामवंत क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी बेळगाव येथील बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या आवारात येईल बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या प्रशिक्षण केंद्राला धावती सदिच्छा भेट देऊन नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन केले.

सदर भेटीप्रसंगी बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार व कार्यकारी अध्यक्ष दीपक पवार यांच्या हस्ते दिनेश लाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकात बोलताना अविनाश पोतदार यांनी बेळगाव येथील क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासाबद्दल व वाटचालीबद्दल थोडक्यात माहिती देऊन जुन्या खेळाडूंच्या योगदानाची वाहव्वा केली.

तसेच दिनेश लाड यांनी रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड यासारख्या खेळाडूंना कसे घडविले याची माहिती दिली. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने छत्रपती श्री शिवाजी महाराज पुरस्कार आणि भारत सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरव केला अशी लाड यांची ओळख पोतदार यांनी करून दिली.

सत्काराला उत्तर देताना क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी एखाद्या खेळात यशस्वी होण्यासाठी खेळाडूंनी परिश्रम घेणे किती महत्त्वाचे आहे याची सोदाहरण देऊन उलगडून सांगितले. प्रत्येक स्तरावर कोणत्या प्रकारे तयारी करावयास हवी याबद्दल मार्गदर्शन केले. खेळाडूंच्या जडणघडणीमध्ये पालकांचा व प्रशिक्षकांचा कसा सहभाग असला पाहिजे याबद्दल देखील मार्गदर्शन केले.

बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या कार्याची स्तुती करून क्लबची या पुढची वाटचाल देखील गौरवशाली असेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच येथील खेळाडूंमधील गुणवत्ता पाहून बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून वर्षातून किमान दोन वेळा तरी बेळगावला भेट देऊन खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्यापर्यंत मार्गदर्शन करण्याची ग्वाही देखील दिनेश लाडे यांनी दिली.

याप्रसंगी दिनेश लाड यांच्या हस्ते बेळगावचा पुणे येथे खेळणारा खेळाडू ज्ञानेश्वर श्रेयकर याचा क्रिकेटची बॅट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास बीके मॉडेल हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एम. जोशी, रवी घाटगे, बाळकृष्ण पाटील, विजयकुमार पाटील, विठ्ठल भट, आनंद करडी आदींसह बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे सदस्य, नवोदित युवा खेळाडू, पालकवर्ग व क्रीडाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळकृष्ण पाटील, रवी घाटगे आणि विजयकुमार यांनी विशेष परिश्रम घेतले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.