belgaum

पोलिसांना खोटी माहिती देणे अंगलट; गुन्हा दाखल

0
586
 belgaum

बेळगाव लाईव्ह :पोलिसांना खोटी माहिती देणे अंगलट आले असून अशा प्रकारे चुकीची तक्रार केल्यास संबंधित व्यक्तीवर थेट गुन्हा नोंद होऊ शकतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. बेळगाव शहरात पोलिस कंट्रोल रूमला अत्याचार व खून झाल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेळगाव शहरातील उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शिवानंद परशुराम कोप्पळकर (रा. नेहरू नगर, अळनावर कडबगट्टी, जि. धारवाड) असे गुन्हा नोंद झालेल्या इसमाचे नाव आहे. शिवानंद याने 112 या क्रमांकावर फोन करून उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजजवळ अत्याचार आणि खून झाल्याची माहिती पोलिस कंट्रोल रूमला दिली होती.

सदर माहिती मिळताच कंट्रोल रूमच्या सूचनेवरून उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र तपासाअंती संबंधित ठिकाणी कोणतीही अत्याचार किंवा खुनाची घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाले. शिवानंद याने मुद्दाम खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली.

न्यायालयाच्या निर्देशानुसार काल शुक्रवारी उद्यमबाग पोलीस ठाण्यात शिवानंद कोप्पळकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून खोटी माहिती देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही यानिमित्ताने देण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.