बेळगाव लाईव्ह :विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) बेळगावच्या ज्ञान संगममध्ये असलेल्या व्हीटीयू सभागृहामध्ये व्हीटीयू राष्ट्रीय अभियांत्रिकी ग्रंथपालकत्व संमेलनाचे (व्हीटीयुएनसीईएल -2025) आज उद्घाटन झाले.
व्हीटीयूच्या श्री. एस. जी. बाळेकुंद्री केंद्र ग्रंथालय आणि माहिती केंद्राच्यावतीने आयोजित या तीन दिवसाच्या राष्ट्रीय पातळीवरील संमेलनामध्ये देशाच्या विविध भागातील ग्रंथपालक, शिक्षण तज्ज्ञ, संशोधक आणि माहिती तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.
सदर संमेलनाच्या उद्घाटनानंतर बोलताना व्हीटीयूचे सल्लागार प्रा. मुत्तय्या कोगनूरमठ यांनी अभियांत्रिकी ग्रंथालय शास्त्रामध्ये होत असलेले समकालीन बदल आणि माहिती पोहोचवण्याचे नवे आयाम याबद्दल माहिती दिली. त्यांनी प्रामुख्याने ग्रंथालयाच्या सेवांचे डिजिटल परिवर्तन, ज्ञान वाटप, संशोधनाला पूरक सेवा, ई प्रवेश, डेटा आधारित ग्रंथालयाचे कामकाज वगैरे विषयांवर आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्हीटीयूचे उपकुलगुरू डॉ. एस. विद्याशंकर यांनी गुणवत्तापूर्ण ज्ञानदान, संशोधन आणि नवोद्योगांसाठी आधुनिक ग्रंथालय प्रमुख केंद्र बनली आहेत असे सांगितले. सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत ग्रंथपालकांनी केवळ ग्रंथालया पुरते आपले काम मर्यादित न ठेवता जास्तीत जास्त विद्यार्थी ग्रंथालयात येऊन वाचन करतील या दृष्टीने योजना आपल्या पाहिजेत.
नवनव्या कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचन प्रवृत्ती वाढवली पाहिजे. यासाठी जमत असल्यास ग्रंथालय 24 तास सुरू ठेवली पाहिजेत असे मत डॉ. विद्याशंकर यांनी व्यक्त केले. सध्याच्या युगात अत्यंत वेगाने विकसित होणारे ज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संशोधन उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचा बदल घडवून आणत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), सायबर सुरक्षा, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी), सुस्थीर तंत्रज्ञान (सस्टेनेबल टेक्नॉलॉजीस), प्रगत उत्पादन तंत्र वगैरे नवनवीन प्रगती अभियांत्रिकी शाखांमध्ये सतत रूपांतरित केली जात असते असे सांगून उपकुलगुरू डॉ. एस. विद्याशंकर यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.

प्रारंभी कुलसचिव प्रासाद रामपुरे यांनी उपस्थित आमचे स्वागत केले संमेलनाचे संयोजनाधिकारी डाॅ. सोमराय तळ्ळोळी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी व्यासपीठावर व्हीटीयूचे कोषाधिकारी डॉ. प्रशांत नायक व व्हीटीयूच्या दावणगेरे कॉलेजचे प्राचार्य प्रा. नागराजप्पा हेदेखील उपस्थित होते संमेलनाचे संचालक डॉ. सिदलिंगय्या एच. यांनी प्रास्ताविक केले.
व्हीटीयूचे मूल्यमापन कुलसचिव प्रा. उज्वल यु. जे. यांनी सर्वांचे आभार मानले. सदर संमेलनामध्ये 150 ते 200 प्रतिनिधींनी भाग घेतला असून सुमारे 72 संशोधनात्मक प्रबंध सादर केले जाणार आहेत. याबरोबरच तांत्रिक अधिवेशन आणि चर्चासत्रं होणार आहेत.





