बेळगाव लाईव्ह : खानापूर शहरातील राजा शिवछत्रपती चौक ते मरिअम्मा मंदिर या मुख्य रस्त्याचे काम मंजूर आराखड्यानुसार व्हावे, तसेच बेकायदेशीर अतिक्रमणे हटवावीत, या मागणीसाठी दोन माजी नगरसेवकांनी आज खानापूर नगरपंचायतीसमोर आमरण उपोषण सत्याग्रह सुरू केला आहे. या आंदोलनाला खानापूर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला असून, १०० हून अधिक ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.
खानापूर शहरासाठी मंजूर झालेल्या १४ कोटी रुपयांच्या निधीतून शहरांतर्गत रस्त्यांचे काम सुरू आहे. मात्र, हे काम करताना रस्ता रुंदीकरण न करणे, अतिक्रमणांवर कारवाई न होणे आणि आराखड्याला डावलून काम सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. याविरोधात माजी नगरसेवक व पत्रकार दिनकर मरगाळे आणि विवेक गिरी यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
यावेळी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले असता, “रस्त्याचा अंदाज आराखडा सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी तयार केला असून नगरपंचायतीचा त्याच्याशी थेट संबंध नाही,” असे सांगत त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
काही राजकीय हितसंबंधांमुळे अतिक्रमण हटवण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे, असा गंभीर आरोप माजी नगरसेवकांनी केला आहे. राजा शिवछत्रपती चौक ते मरिअम्मा मंदिर रस्ता आराखड्यानुसार व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वेळा नोटिसा देऊनही नगरपंचायत प्रशासन ढिम्म असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“शहरातील अतिक्रमणे हटवण्याऐवजी मुख्याधिकारी संबंधित ठेकेदार आणि अतिक्रमणधारकांना पाठीशी घालत आहेत. प्रशासनाचा हा हलगर्जीपणा शहराच्या विकासाला अडथळा ठरत आहे. जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचे उपोषण सुरूच राहील,” असा इशारा माजी नगरसेवक दिनकर मरगाळे यांनी दिला.
या आंदोलनात माजी आमदार दिगंबर पाटील, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, पंडित ओगले, गोपाळ पाटील, गोपाळ देसाई, सुरेश देसाई, सूर्याजी पाटील, मुरलीधर पाटील, यशवंत बिर्जे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्ता आराखड्यानुसार न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.





