बेळगाव लाईव्ह : बेळगावातील कपिलेश्वर मंदिर तलावात मध्यरात्री आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी प्राणांची बाजी लावून वाचवले. पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे या तरुणाला मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
२८ जानेवारी रोजी पहाटे २ च्या सुमारास एक तरुण तलावाच्या पाण्यात बुडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न लावता पोलीस कर्मचाऱ्यांनी पाण्यात उडी घेतली आणि त्याला सुखरूप काठावर आणले. तरुण बेशुद्धावस्थेत असल्याने पोलिसांनी तातडीने त्याला सीपीआर दिला, ज्यामुळे त्याचे प्राण वाचले.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच तुडवेकर यांनी आपल्या टीममधील पद्मप्रसाद हुली आणि मायकल पिंटो यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणाचे समुपदेशन सुरू केले.

शुद्धीवर आल्यानंतर संबंधित तरुणाने पथकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि जवळच असलेल्या रेल्वे रुळाच्या दिशेने धाव घेतली. मात्र, उपस्थितांनी त्याला वेळीच रोखून धरले. सखोल चौकशी दरम्यान, कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक तणावाखाली असल्याने टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली त्या तरुणाने दिली.
कर्नाटक राज्य पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या समन्वयामुळे एका तरुणाचे प्राण वाचले असून या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. संबंधित तरुणाला पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.





