बेळगाव लाईव्ह : आगामी 21 जानेवारी रोजी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नी होणाऱ्या सुनावणीनंतर सीमाभागात मराठी भाषेवर होत असलेल्या अन्यायाविरोधात भव्य मोर्चा काढून कानडी संघटना ना जशास तसे उत्तर देण्याचा ठाम निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला.
मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांच्या अनुपस्थितीत खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा मंदिर येथे ही बैठक पार पडली. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात मराठी फलकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, त्याविरोधात संघटित आंदोलन छेडण्याची भूमिका बैठकीत स्पष्ट करण्यात आली.
बैठकीत कन्नड संघटनांकडून मराठी व इंग्रजी फलक हटवण्याच्या कथित प्रकारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. व्यापाऱ्यांवर दबाव टाकून फलक काढून घेण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप करत, अशा कारवायांना संघटित व ठोस प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी 17 जानेवारी रोजी बेळगाव व कंग्राळी खुर्द येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. बैठकीत बोलताना नेत्यांनी सांगितले की, 1972 साली मराठी भाषेसाठी काढण्यात आलेल्या डांबर मोर्चाच्या धर्तीवर मराठी फलकांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर मोर्चाची तारीख निश्चित केली जाईल. त्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रशासनाला आंदोलनाबाबत सूचित करण्यात येणार आहे.

कन्नड संघटनांचे मोजके कार्यकर्ते पोलिस संरक्षणात शहरात गोंधळ घालत असल्याचा आरोप करत, मराठी भाषिकांनी कोणतीही कारवाई झाली तरी शांततापूर्ण पण ठाम भूमिका ठेवत माघार घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले. पक्षभेद विसरून सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येऊन मराठी भाषा व अस्मितेसाठी संघटितपणे काम करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.
बैठकीत प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, रामचंद्र मोदगेकर, आर. एम. चौगुले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले. बैठकीस रणजीत चव्हाण-पाटील, राजू मरवे, लक्ष्मण होनगेकर, अनिल पाटील, अॅड. एम. जी. पाटील, मनोहर हुंदरे, बी. ओ. येतोजी, मल्लाप्पा गुरव, गोपाळ पाटील, रावजी पाटील, विकास कलघटगी, विलास बेळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.





