बेळगाव लाईव्ह : कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी येथील मलप्रभा सहकारी साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराबाबतचा न्यायालयीन चौकशी अहवाल सरकारने विलंब न लावता जाहीर करावा, अशी मागणी भारतीय कृषक समाजाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी केली आहे.
उत्तर कर्नाटकातील या महत्त्वाच्या साखर कारखान्यात आर्थिक अफरातफर आणि सत्तेचा गैरवापर झाल्याचे गंभीर आरोप सिद्धगौडा मोदगी यांनी पत्रकार परिषदेत केले. २०१७-१८ च्या हंगामातील शेतकऱ्यांची ७ कोटी ८० लाख रुपयांची थकबाकी अद्याप मिळालेली नाही, तसेच गोदामातील साखरेचा अवैध साठा आणि नियमबाह्य नियुक्त्यांबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती, अशी माहिती सिद्धगौडा मोदगी यांनी दिली.
कारखान्यातील या प्रकरणांची दखल घेत साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी संयुक्त न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते आणि सदर चौकशी पूर्ण होऊन अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे, असे सिद्धगौडा मोदगी यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे हित आणि कारखान्यातील पारदर्शकता जपण्यासाठी सरकारने हा अहवाल तातडीने लोकांसमोर ठेवावा, अशी भूमिका सिद्धगौडा मोदगी यांनी मांडली.
या पत्रकार परिषदेला ईरप्पा पट्टेण्णा, मल्लिकार्जुन आणि इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.





