बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी भाषिकांचा आवाज दाबण्यासाठी आणि भाषिक द्वेषाची परंपरा कायम राखण्यासाठी ‘कित्तूर कर्नाटक सेने’ने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. बेळगावातील मराठी तरुण नेतृत्वावर निशाणा साधत, समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्यावर ‘गुंडा ॲक्ट’ लावून त्यांना बेळगावातून कायमचे हद्दपार करावे, अशी प्रक्षोभक मागणी या संघटनेने केली आहे.
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान या कन्नड संघटनेने प्रशासनाला निवेदनाव्दारे ही चिथावणी दिली.
कित्तूर कर्नाटक सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष महेश शिगीहळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुठभर कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात त्यांनी शुभम शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा उल्लेख ‘देशद्रोही’ असा करत, त्यांच्यामुळे कन्नडिगांच्या स्वाभिमानाला धक्का लागत असल्याचा जावईशोध लावला आहे.

वास्तविक, बेळगावातील शांतता बिघडवण्याचे काम या कन्नड संघटनाच करत असताना, उलट मराठी भाषिकांनाच लक्ष्य करण्याचा घाट घातला जात आहे.
इतकेच नव्हे तर, ६० टक्के कन्नड नामफलकांच्या नावाखाली मराठी फलकांना लक्ष्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करू नयेत, असा दबावही प्रशासनावर टाकण्यात येत आहे. सीमाभागातील मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात असताना, कन्नड संघटनांच्या या मागणीमुळे भाषिक तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रशासकीय यंत्रणेला वेठीला धरून मराठी भाषिकांच्या लोकशाही मार्गाने चालणाऱ्या लढ्याला ‘गुंडगिरी’ ठरवण्याचा हा प्रयत्न असून, यामुळे बेळगावातील मराठी वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.





