बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील भंडारगाळी गावाच्या हद्दीत गर्लगुंजी–खानापूर रस्त्यावर झालेल्या दुर्दैवी दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भुजंग पुंडलिक धबाले (वय ३२, रा. चापगाव, ता. खानापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजता भुजंग धबाले हा चापगाव येथून पांडुरंग परशुराम पाटील (रा. चापगाव) यांची केए-२२ / एचव्ही-४५७७ क्रमांकाची दुचाकी घेऊन बाहेर पडला होता. मात्र, तो घरी परतला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल फोनही बंद होता. अखेर दि. १० डिसेंबर २०२५ रोजी नंदगड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता विजय शाहू चोपडे (रा. शिवाजीनगर, खानापूर) यांना भंडारगाळी गावाच्या हद्दीत रस्त्यालगत असलेल्या नाल्याजवळील खड्ड्यात सदर दुचाकी पडलेली आढळून आली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी पाहणी केली असता, गार्लगुंजीकडून खानापूरकडे येताना अतिवेग व निष्काळजीपणामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याने चालकाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. मृताच्या कपड्यांवरून त्याची ओळख पटवण्यात आली. प्राथमिक तपासात अतिवेग व निष्काळजी वाहनचालनामुळेच हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.





