बेळगाव लाईव्ह :खानापूर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या हद्दींवरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी अखेर प्रशासनाने ठोस पाऊल उचलले आहे. शहरातील संबंधित रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून दि. 2 व 3 फेब्रुवारी 2026 रोजी प्रत्यक्ष जागेवर हद्द मोजणी व सीमांकन (मार्किंग) करण्यात येणार आहे.
माजी नगरसेवक दिनकर मरगाळे व विवेक गिरी यांनी केलेल्या उपोषणामुळे या प्रकरणाला गती मिळाली. तसेच खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या पाठिंब्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
खानापूर शहरातील विविध सर्वे नंबरला लागून असलेल्या रस्त्यांच्या अचूक हद्दी निश्चित करण्यासाठी भूदाखले विभागाकडून अधिकृत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात भूदाखले सहायक संचालक, खानापूर यांनी अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
जाहीरनाम्यानुसार, खानापूर गावातील रि.स.नं. 95/अ, 95/ब, 96/अ, 96/ब, 51, 49, 48, 97, 95 व 96 या सर्वे नंबरलगत असलेल्या रस्त्यांची मोजणी दि. 14 जानेवारी 2026 रोजी पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतर अभिलेखांची तपासणी करून नकाशा तयार करण्यात आला आहे.
या आधारे, दि. 2 व 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता संबंधित रस्त्यांच्या हद्दींची प्रत्यक्ष जागेवर ओळख करून सीमांकन व मार्किंग केले जाणार आहे. या प्रक्रियेसाठी सर्व संबंधित पक्षकार, अधिकारी व नागरिकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन भूदाखले सहायक संचालकांनी केले आहे.
या कारवाईनंतर संपूर्ण अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या संदर्भात तालुका तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), खानापूर उपविभाग आणि खानापूर नगर पंचायत यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संभाव्य कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग, महसूल निरीक्षक आणि ग्राम प्रशासन अधिकारी यांनाही उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना रस्त्यालगतच्या इमारतधारक व नागरिकांना पूर्वसूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रकरणातील अर्जदारांचे वकील अॅड. आय. आर. घाडी (खानापूर) यांनाही या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. संपूर्ण सीमांकन प्रक्रिया वरिष्ठ भूमापक श्री. राजप्पा पट्टणशेट्टी व श्री. हरीश गणाचारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
दरम्यान, ब्लॉक काँग्रेस, सर्वपक्षीय नेते तसेच माजी नगरसेवक दिनकर मरगाळे व विवेक गिरी यांच्या वतीने शहरातील नागरिक, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींना दि. 2 व 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





