बेळगाव लाईव्ह :“मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य संपुष्टात येईल असे भाकीत वारंवार केले जाते; मात्र गेली दोन हजार वर्षे विविध आक्रमणांचा सामना करूनही मराठी टिकून आहे आणि पुढेही ती टिकणारच आहे,” असा ठाम विश्वास 41 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. महेंद्र कदम यांनी व्यक्त केला. साहित्य संमेलन म्हणजे केवळ कार्यक्रम नव्हे, तर सांस्कृतिक स्वराज्य जपण्याचा एक यज्ञ असून गेली 41 वर्षे कडोलीत हा यज्ञ अखंड सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
कडोली (ता. जि. बेळगाव) येथील मराठी साहित्य संघातर्फे, राज्य मराठी विकास संस्था मुंबई व सांगाती साहित्य अकादमी बेळगाव यांच्या सहकार्याने आयोजित 41 वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवारी साहित्यप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.
कडोली गावातील स्वामी विवेकानंद साहित्य नगरी (श्री दुरदुंडेश्वर विरक्त मठाचे आवार) येथे भरलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर येथील प्राचार्य महेंद्र कदम होते. संमेलनाची सुरुवात सकाळी 9.30 वाजता ग्रंथदिंडीने झाली.
श्री कलमेश्वर भजनी मंडळाचे ह. भ. प. कृष्णा चन्नाप्पा मस्कर यांच्या हस्ते पालखी पूजन करून ग्रंथदिंडीचा शुभारंभ झाला. साहित्यिक, कवी व साहित्यप्रेमींच्या सहभागात सवाद्य निघालेली ही ग्रंथदिंडी गावातील प्रमुख मार्गांवरून फिरत संमेलनस्थळी पोहोचली.
संमेलनस्थळी मंडप, सांगाती व्यासपीठ व ग्रंथदालनाचे उद्घाटन अनुक्रमे प्रगतशील शेतकरी सुनील अंद्याप्पा चौगुले, सांगाती पतसंस्था शिनोळीचे संचालक दशरथ परशराम कांबळे व प्रगतशील शेतकरी सदाशिव लिंगाप्पा कटांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष सविता सु. पाटील यांनी उपस्थित मान्यवर व साहित्यप्रेमींचे स्वागत केले.

छत्रपती शिवाजी महाराज, श्री सरस्वती, सावित्रीबाई फुले, संत ज्ञानेश्वर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन अनुक्रमे के. पी. कालकुंद्रीकर, ओमाण्णा कल्लाप्पा चौगुले, रेखा सूर्याजी कुट्रे, रेखा लक्ष्मण पाटील व विनोद सदाशिवराव भोसले यांच्या हस्ते झाले. त्यानंतर केदार क्लिनिक कडोलीचे डॉ. अविनाश शंकर कुट्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले.
उद्घाटनानंतर अध्यक्षीय भाषणात प्रा. महेंद्र कदम म्हणाले की, स्वराज्य ही केवळ राजकीय संकल्पना नव्हती, तर ती सांस्कृतिक व भाषिक आत्मसन्मानाची चळवळ होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या भूमीतून उभे केलेले स्वराज्य हे संपूर्ण भारताला केंद्रस्थानी आणणारे होते. अशा ऐतिहासिक भूमिकेची जाणीव ठेवूनच आज साहित्य संमेलनांची भूमिका ठरवावी लागते.
“मराठी माणूस मराठी बोलत नाही, म्हणून मराठी संपेल,” असे विधान केले जाते; पण इतिहास साक्ष देतो की इस्लामी आक्रमणे, इंग्रजी सत्ता अशा अनेक संकटांवर मात करूनही मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट झालेली नाही. ग्रंथदिंडीपासून सुरू होणारी परंपरा ही मराठीच्या जिवंतपणाची साक्ष आहे, असे त्यांनी सांगितले. कडोलीत गेली चार दशके अखंडपणे साहित्य संमेलन सुरू असणे ही अभिमानाची बाब असून हेच मराठी साहित्याचे खरे सामर्थ्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

विविध सत्रांत साहित्यिक मेजवानी
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात दुपारी 1 ते 2 या वेळेत नाशिकचे व्याख्याते प्रा. राजेश्वर शेळके यांचे ‘जगण्याचे पैलू शंभर’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान झाले. स्नेहभोजनानंतर तिसऱ्या सत्रात स्थानिक कवींनी सहभाग घेतलेले काव्यतरंग कवी संमेलन पार पडले. चौथ्या सत्रात सांगलीचे रवी राजमाने यांनी ‘मी व माझी कथा’ हा कार्यक्रम सादर केला.
समारोपाच्या पाचव्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन झाले. यात प्रा. श्रीनिवास मस्के (नांदेड), कवयित्री पूजा भडांगे (पुणे) आणि कवयित्री कदम (सांगली) यांनी सहभाग घेतला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हे साहित्य संमेलन उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. परगावच्या अनेक साहित्य व काव्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी मराठी साहित्य संघ कडोलीचे अध्यक्ष शिवाजी कुट्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले




