belgaum

बुद्ध, छ. शाहू महाराजांच्या स्मारकांबद्दल कन्नड संघटनेला पोटशूळ

0
1377
 belgaum


बेळगाव लाईव्ह : बेळगाव किल्ला तलाव परिसरात भगवान गौतम बुद्ध यांचे स्मारक आणि केएलई हॉस्पिटल जवळील राष्ट्रीय महामार्गालगतच्या चौकात छत्रपती श्री शाहू महाराज यांचा पुतळा बसवण्याच्या निर्णयामुळे कन्नड संघटनेच्या पोटात गोळा आला आहे. या थोर महापुरुषांच्या स्मारकांना विरोध करत, त्याऐवजी कर्नाटकातील वीरांचेच पुतळे बसवावेत, अशी सामाजिक तेढ निर्माण करणारी मागणी करत या संघटनेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी आज सोमवारी महानगरपालिका आवारात जोरदार गोंधळ घातला. लोकशाही मार्गाने लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची ‘कोल्हेकुई’ करत या हुल्लडबाजांनी प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला.

दलित संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे शहरात बुद्ध आणि शाहू महाराजांचे पुतळे बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, यामुळे पोटशूळ उठलेल्या काही विघ्नसंतोषी कार्यकर्त्यांनी आज महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र एकीकरण समितीने हुतात्मा दिनी दिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांमुळे या संघटनेचा जळफळाट झाला असून, याच द्वेषातून त्यांनी समितीवर बंदी घालण्याची गरळ ओकली आहे. महापौर मंगेश पवार आणि पालिका अधिकाऱ्यांना निवेदन देताना या करवे म्होरक्यांनी अत्यंत उद्धट भाषेचा वापर केला.

निवेदन सादर करताना एका म्होरक्याने बेळगावमधील दुकानांच्या नामफलकांवर ६० टक्के कन्नड भाषेची सक्ती करण्याची मागणी केली. “आम्ही उन्हातान्हात कन्नडसाठी राबत असताना महापालिका प्रशासन इतर भाषिकांच्या बैठका कशा घेते?” असा सवाल करत या आंदोलकांनी भाषिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची मागणी करत पुन्हा एकदा समितीला लक्ष्य करण्यात आले.

 belgaum

महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन देताना या करवे म्होरक्याने आपल्या मर्यादा ओलांडल्या. तावातावाने बोलताना त्याने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी एकेरीत संवाद साधत त्यांच्याबद्दल अवमानकारक आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. हा प्रकार पाहून उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत या म्होरक्याला चांगलेच धारेवर धरले. “तू एका प्रथम दर्जाच्या सरकारी अधिकाऱ्याशी बोलत आहेस याचे भान ठेव. लोकशाहीत निवेदन देण्याचा अधिकार असला तरी सरकारी अधिकाऱ्याशी सभ्यतेनेच वागले पाहिजे, अन्यथा ही अरेरावी खपवून घेतली जाणार नाही,” अशा कडक शब्दांत पोलिसांनी त्याला सुनावले.

दहा-पंधरा कार्यकर्त्यांच्या या जमावाने केवळ भाषिक तेढ निर्माण करण्यासाठी आणि थोर महापुरुषांच्या स्मारकांमध्ये अडथळे आणण्यासाठी हा ‘स्टंट’ केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. पोलीस निरीक्षकांनी वेळीच समज दिल्याने हे हुल्लडबाज काहीसे नरमले असले, तरी अशा प्रकारच्या प्रक्षोभक मागणी करणाऱ्यांवर आणि सरकारी अधिकाऱ्यांचा अपमान करणाऱ्यांवर प्रशासन कठोर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.