बेळगाव लाईव्ह :नेहरूनगर, बेळगाव येथील श्री बसवण्णा महादेव मंदिर आवारात ड्रेनेजचे सांडपाणी शिरून मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. तरी लोकप्रतिनिधींसह महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित ड्रेनेजची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी देवस्थान समिती व नागरिकांकडून केली जात आहे.
नेहरूनगर येथील दुसऱ्या व तिसऱ्या क्रॉसला जोडणारी ड्रेनेज पाइप तुटलेली असल्यामुळे मलमूत्रयुक्त सांडपाणी थेट श्री बसवण्णा महादेव मंदिराच्या प्रवेशद्वार व आवारात वाहत आहे. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे.
मंदिर परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मंदिरात सदाशिव नगर, शाहूनगर, शिवबसवनगर तसेच आसपासच्या भागांमधून अनेक भाविक दररोज पूजा व दर्शनासाठी येतात. मंदिरा आवारात निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे भाविकांच्या आरोग्यासही गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, मंदिराच्या स्वयंपाकघरात तसेच व्यवस्थापनाशी संबंधित गरीब कुटुंबांच्या घरांमध्येही सांडपाणी शिरत असून तेथे राहणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
तरी स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधींसह महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी व तुटलेली ड्रेनेज पाइप दुरुस्त करून श्री बसवण्णा महादेव मंदिराच्या प्रवेशद्वार व आवारातल स्वच्छतेची समस्या शक्य तितक्या लवकर सोडवावी, अशी जोरदार मागणी नेहरू नगर रहिवासी आणि श्री बसवण्णा महादेव मंदिर समितीने केली आहे.




