बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील काँग्रेस रोड रस्त्यावर काल एका युवकाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी काल सायंकाळी स्वतः टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट जवळ रहदारी नियंत्रण करत वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.
टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट जवळ दुपदरी काँग्रेस रोडवर अलीकडे वारंवार अपघात होत आहेत. याला कारणीभूत रेल्वे गेट जवळ घातलेले बॅरिकेड्स असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. कारण बॅरिकेड्स घालून दुसऱ्या मार्गावर जाणारा रस्ता अडविण्यात आल्यामुळे वळसा घालून जाणे टाळण्यासाठी वाहनचालक बिनदिक्कतपणे वन-वे मधून आपली वाहने हाकतात.
या खेरीज सदर रस्ता हा सततचा रहदारीचा असल्यामुळे बऱ्याचदा पादचारी व दुचाकी वाहन चालकांसाठी रस्ता ओलांडणे धोकादायक बनत असते. सदर रस्त्यावर काल दुपारी भरधाव ट्रकच्या ठोकरीने एक युवक जागीच ठार झाला.
या पार्श्वभूमीवर सदर रस्त्यावर पहिल्या रेल्वे गेट जवळ गेट पडलेले असल्यास विशेषता सायंकाळनंतर वाहन चालकानीं डाव्या बाजूला शिस्तबद्धरीत्या आपली वाहने थांबून रस्त्याची उजवी बाजू मागून पुढे जाणाऱ्या वाहनांसाठी खुली ठेवावी. वनवेमध्ये विरुद्ध दिशेने जाऊ नये.

अवजड वाहन चालकांनी गतिरोधक तसेच अप्रोच रस्त्याच्या ठिकाणी वेग मर्यादा कमी ठेवावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी केले आहे.
याखेरीज चौगुले यांनी काल सायंकाळी रहदारी पोलिसांच्या गैरहजेरीत टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट येथे थांबून रहदारी नियंत्रण करण्याद्वारे वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्याचे गुन्हे आणि वाहतूक पोलीस उपायुक्त एन. निरंजनराजे अरस यांनी कौतुक केले आहे.




