बेळगाव लाईव्ह :जिल्हा पंचायत बेळगाव, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभाग तसेच कर्नाटक व्हेटरनरी असोसिएशन (जिल्हा शाखा, बेळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने “बेळगाव श्वान व मांजर प्रदर्शन – २०२६” चे आयोजन आज प्रजासत्ताक दिनी सरदार मैदानावर करण्यात आले.
गेल्या तब्बल १६ वर्षांपासून बंद असलेले हे प्रदर्शन जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून पुन्हा सुरू झाले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री सतीश आर. जारकीहोळी यांनी रोपट्याला पाणी घालून केले. आपल्या भाषणात त्यांनी जबाबदार पाळीव प्राणी संगोपन, रेबीज व इतर प्राणीजन्य आजारांचा प्रतिबंध आणि जनजागृतीद्वारे प्राणी कल्याण वाढवण्यावर भर दिला.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायतचे सीईओ राहुल शिंदे, बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सैत, तसेच पशुसंवर्धन विभाग व कर्नाटक व्हेटरनरी असोसिएशनचे अधिकारी उपस्थित होते.
प्रदर्शनात विविध जातींचे श्वान आणि मांजरे सहभागी झाले होते. पाळीव प्राण्यांबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे, जबाबदार संगोपनाचा संदेश देणे आणि प्राणी कल्याणाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.





