बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आज सर्वोच्च न्यायालयात होणारी महत्त्वाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकारामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, मुंबईतील पत्रकार संदीप राजगोळकर यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे.
मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी येथील रहिवासी आणि बेळगाव सीमापनासाठी एकेकाळी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणारे संदीप हे नेहमीच सीमा लढ्यात अग्रभागी राहिलेले आहेत. त्यांनी कोल्हापूर मुंबई दिल्लीमध्ये पत्रकारिता करत असताना बेळगाव सीमा प्रश्न विषयी नेहमीच पाठिंबा दिलेला आहे.
संदीप राजगोळकर यांनी आक्रमक पवित्रा घेत म्हटले की, “सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे वकील पूर्णपणे अपयशी ठरत आहेत. वारंवार सुनावणी पुढे ढकलली जात असताना हे वकील न्यायालयात काय करतात? अशा कुचकामी वकिलांची तात्काळ हकालपट्टी करून त्या जागी निष्णात कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करा.” अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून हा खटला प्रलंबित असून आजच्या सुनावणीकडून सीमावासीयांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, पुन्हा एकदा तारीख पुढे ढकलल्याने “सीमावासीयांना न्याय कधी मिळणार?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य सरकारने आता या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून वकिलांचे पॅनेल बदलण्याची वेळ आली आहे, असा स्पष्ट सल्लाही त्यांनी दिला आहे.
कर्नाटक सरकारकडून सीमाभागात मराठी जनतेवर होणारी भाषिक गळचेपी थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महत्त्वाचा आहे. मात्र, न्यायप्रक्रियेत होणारी ही दिरंगाई मराठी भाषिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी असून सरकारने तातडीने नवीन वकिलांची नियुक्ती करून या प्रकरणाला गती द्यावी, अशी मागणी करत सीमाप्रश्नी काम पाहणाऱ्या वकिलांवर राजगोळकर यांनी खरमरीत टीका केली आहे.





