बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात मालमत्ता व्यवहारांमध्ये होणारे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आता मालमत्ता नोंदणीच्या वेळी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले असून, यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता येणार आहे.
बनावट व्यक्ती उभ्या करून मालमत्ता हडपण्याचे किंवा फसवणुकीचे प्रकार जिल्ह्यात समोर येत होते. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आणि सरकारी मालमत्तांचे संरक्षण करणे, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले आहेत.
या नवीन आदेशामुळे मालमत्ता नोंदणीच्या वेळी संबंधित व्यक्तीची खरी ओळख पटवणे सोपे होणार आहे.
मालमत्ताधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि भूमाफियांच्या कारवायांना चाप लावण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आता प्रत्येक नोंदणी प्रक्रियेत आधार दुरूस्ती आणि प्रमाणीकरणाचा वापर करणे अनिवार्य असेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.





