बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील तीर्थकुंडे गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर दगड उत्खननावर कारवाई करावी या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन गावकऱ्यांनी आज सोमवारी बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केले.
तीर्थकुंडे गावकऱ्यांनी सोमवारी सकाळी महेश शेगीहल्ली यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गावालगतच्या बेकायदा दगड उत्खननावर कारवाई करण्याबरोबरच जेजेएम प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची आणि गावात मूलभूत सुविधा पुरवण्याची मागणी केली.
खानापूर तालुक्यातील तीर्थकुंडे गावात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 7 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले असून निविदाही मंजूर झाल्या आहेत.
मात्र, काम सुरू झालेले नसल्यामुळे लोकांमध्ये पाण्याची ओरड आहे. तसेच गावातील रस्ते विकसित झालेले नाहीत. बसची समस्या गंभीर असल्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन अडचणी येत आहेत. याबाबत तक्रार करूनही खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर हे कोणतीही समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर खाण कामाबद्दल वेळोवेळी तक्रार करून देखील त्याचीही कोणी दखल घेत नाही. या सर्व समस्यांची माहिती देऊन महेश शेगीहल्ली यांनी जिल्हा पंचायत सीईओंना गावाला भेट देऊन समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.


