बेळगाव लाईव्ह : ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून खबरदारीचे सर्व उपाय योजण्यात आले आहेत. शांतता भंग होऊ नये आणि उत्सवाच्या काळात शिस्त राखली जावी यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
नवीन वर्षाच्या बंदोबस्तासाठी ४ पोलीस उपअधीक्षक, २४ पोलीस निरीक्षक, ३४ पोलीस उपनिरीक्षक, ८९ साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ६६० पोलीस कर्मचारी आणि ३०० होमगार्ड्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय सीएआरच्या ७ आणि केएसआरपीच्या ३ तुकड्या तैनात राहतील. ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यप्राशन करून वाहन चालवणे, सीट बेल्ट न वापरणे आणि हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर १०,००० रुपये दंड आकारला जाईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शहराच्या सर्व भागांवर देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून पोलीस कर्मचारी बॉडीवॉर्न कॅमेरे आणि ड्रोनचा वापर करतील, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

दिनांक २६ डिसेंबर रोजी शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. बार आणि रेस्टॉरंटमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन मुलांनी लॉजिंगची मागणी केल्यास त्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश दिले आहेत. फटाके फोडण्याच्या ठिकाणी सुरक्षेची साधने ठेवून आगीच्या घटना रोखण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश आणि बाहेर जाण्याचे मार्ग स्पष्टपणे दिसतील असे फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणतीही छोटी-मोठी घटना घडल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्ष किंवा ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, नागरिक, हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांनी पोलीस निर्देशांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती पोलीस आयुक्तांनी केली आहे.




