बेळगाव लाईव्ह : बेळगाव शेतकरी संघटनेने हायवे आणि बळळारी नाल्याशी संबंधित विविध समस्या आमदार आसिफ सेठ यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानुसार बुधवारी आमदार सेठ यांनी हायवे परिसर आणि बळळारी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली.
प्रामुख्याने हायवे सर्व्हिस रस्त्यावरील ड्रेनेज पाईपवर प्लॉटधारकाकडून बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा अडथळला जाऊन शेतवाडीत पाणी साचण्याची व पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे शेतकरी संघटनेने सांगितले. यावर आमदार सेठ यांनी संबंधित प्लॉटधारकांना ड्रेनेज पाईप बसवूनच बांधकाम करण्याचे निर्देश दिले, तसेच नाल्यात पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अबाधित ठेवण्याची सूचना केली.
शेतकऱ्यांची मागणी : बळळारी नाल्याशी संबंधित चार प्रश्न सोडवा
शेतकऱ्यांनी हायवेवरील बळळारी नाला आणि लेंडी नाल्यावर सर्व्हिस रोडवर ब्रीज नसल्याची समस्या मांडली. दोन्ही नाल्यांवर फ्लायओव्हर बांधून रस्ता पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली, कारण पावसाळ्यात नाल्यातून पायी जाणे धोकादायक ठरत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चुकीच्या बांधकामाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचेही त्यांनी नमूद केले. याची पाहणी देखील आमदारांनी केली.
पुढे लेंडी नाल्याची पाहणी करताना समर्थ नगर ते हायवेपर्यंत नाल्याची रुंदी आणि खोली वाढवावी, डिसेंबरपासून या कामाला सुरुवात करावी, तसेच नाल्यावर एका बाजूला बफर झोन तयार करून पावसाळ्यात सफाई सुलभ करावी, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली.
समर्थ नगर–हायवे रस्ता डांबरीकरण करा
समर्थ नगरपासून हायवेकडे जाणारा रस्ता पूर्णपणे डांबरीकरण केल्यास शहरातील वाहतूक कोंडीही काही प्रमाणात कमी होईल, अशी मागणी करण्यात आली. तसेच समर्थ नगर ते हरी काका कंपाऊंड जोडणारा संपर्क रस्ताही डांबरीकरण केल्यास वाहतूक सुलभ होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
या पाहणीदरम्यान शेतकरी संघटनेचे नारायण सावंत, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रमेश मोदगेकर आदी उपस्थित होते.



