बेळगाव लाईव्ह :मळणी करून धान्याची पोती (रास) भरायच्या आशेने कुटुंबासह आनंदाने शेतात गेलेल्या शेतकऱ्याला समोर दिसते ते काळे राखाडी ठिक्कर… विळ्यासारख्या आकाराची जळालेली वळी. कुणीतरी अज्ञातांनी दावा साधलेला असतो, आणि मेहनती शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू अनावर होतात.
चार महिन्यांच्या घामाने, जीव तोड मेहनतीने उभं केलेलं पिक; मुखाशी आलेला घास कुणीतरी हिरावून घेतो, हे दृश्य काळजाला चिर देणारं आहे. अशीच हृदयद्रावक घटना बेळगाव तालुक्यातील मुतगा शिवारात घडली.
मुतगा येथील शेतकरी यल्लाप्पा केदार यांच्या शेतातील मळणीसाठी साठवलेल्या भाताच्या वळ्या (गंज्या) अज्ञातांनी आग लावून जाळल्या. मंगळवारी सकाळी यल्लाप्पा आपल्या कुटुंबासह मळणीसाठी शेतात गेले असता संपूर्ण भाताच्या वळ्या जळून खाक झालेल्या अवस्थेत दिसल्या. या घटनेत जवळपास ₹50,000 इतके नुकसान झाले असून, शेतीवरच उपजीविका करणाऱ्या सहा जणांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
अन्नदात्याच्या अन्नात माती – नेमका दोषी कोण?
रक्ताचं पाणी करून उभं केलेल्या पिकाला अशी आग कशी लागली? कुणाची बेफिकीरी, मस्ती किंवा जाणूनबुजून केलेला प्रकार? हे शोधणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरते.
निसर्गाचा लहरीपणा, प्रतिकूल हवामान, शासनाचा उदासीनपणा – अशा अनेक संकटांचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना आता मानवकृत हानीचाही तडाखा बसू लागला आहे. त्यामुळे समाजाने केवळ प्रेक्षक न बनता, अन्नदात्याला आधार देण्याची गरज आहे.

शिवारात वाढले ‘ओल्या पार्ट्या’ – पोलिस गस्त वाढवण्याची मागणी
सध्या बेळगाव तालुक्यात मळणी हंगाम सुरू असून, भात कापणी झाल्याने रात्रीच्या वेळी शिवारात ‘ओल्या पार्ट्या’ वाढल्या आहेत. शेतात जाऊन व्यसन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवारातील वायर चोरीची घटना उघडकीस आली होती.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, शिवारातील ओल्या पार्ट्या व जुगारावर बंदी आणावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.




