बेळगाव लाईव्ह : बावन सौंदत्ती (ता. रायबाग) गावामध्ये कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला रायबाग तालुक्यातील 19 गावांमधील तलाव पाण्याने भरणाच्या पाणी पुरवठा योजनेचा आज सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते प्रायोगिक तत्त्वावर शुभारंभ करण्यात आला.
सदर योजना सुरू करण्यात आल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणाऱ्या रायबाग तालुक्यातील 19 गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. नदीच्या पाण्याने तलाव भरण्याची ही योजना ग्रामीण भागातील कृषी क्षेत्र, पिण्याचे पाणी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हितावह ठरणार आहे.
आज प्रायोगिक तत्त्वावर या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर गावकऱ्यांनी पाण्याने भरलेल्या तलावाचे पूजन करून आनंद व्यक्त केला. त्याचप्रमाणे मंत्री जारकीहोळी यांचा सत्कार करून त्यांचे शतशः आभार मानले.
याप्रसंगी केपीसीसी सरचिटणीस महावीर मोहिते, डीसीसी बँकेचे संचालक अप्पासाहेब कुलगुडे, युवा नेते अमित घाटगे यांच्यासह स्थानिक नेतेमंडळी आणि गावकरी उपस्थित होते. तलाव पाण्याने भरण्याच्या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन केल्यानंतर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी हुब्बरवाडी, बुदिहाळ, मेखळी आणि मुडलगी या गावांना भेट देऊन तेथील तलावांची पाहणी केली.




