बेळगाव लाईव्ह :बेळगांवचा भारतीय रेल्वे मधील शरीर सौष्ठवपटू केदार पाटील याने सेर्सा अर्थात आग्नेय रेल्वेतर्फे आयोजित 39 व्या ऑल इंडिया इंटर रेल्वे बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप 2025-26 या अखिल भारतीय शरीर सौष्ठव स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत रौप्य पदक पटकावले आहे.
सेर्साने झारखंड येथील चक्रधारपुर येथे गेल्या दि. 8 ते दि. 10 डिसेंबर 2025 पर्यंत सलग 3 दिवस उपरोक्त स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील 65 किलो वजनी गटामध्ये बेळगावच्या केदार पाटील याने द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक पटकाविले.
आग्नेय रेल्वेने सर्वाधिक 100 गुणांसह या स्पर्धेचे सांघिक अजिंक्यपद मिळविले. त्यांच्या मागोमाग मध्य रेल्वे (52 गुण), नैऋत्य रेल्वे (45 गुण), दक्षिण रेल्वे (27 गुण) आणि आयसीएफ (15 गुण) यांनी अनुक्रमे दुसरा तिसरा चौथा व पाचवा क्रमांक मिळविला. शरीर सौष्ठवपटू केदार पाटील याला संघ प्रशिक्षक एकलव्य पुरस्कर विजेते मि. इंडिया प्रीतम चौगुले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
अखिल भारतीय पातळीवरील आंतर रेल्वे शरीर सौष्ठव स्पर्धेतील उपरोक्त यशाबद्दल केदार पाटील याचे बेळगांव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्स व कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्सच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


