बेळगाव लाईव्ह :लोकायुक्त पोलिसांनी काल मंगळवारी पहाटे कृषी खात्याचे बेळगाव जिल्हा दक्षता कक्षाचे सहसंचालक राजशेखर इराप्पा बिजापूर यांच्या धारवाड येथील निवासस्थानासह एकूण सहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून 3 घरे, 3 भूखंड आणि 5.34 कोटी रुपये किमतीची 6 एकरपेक्षा जास्त शेतजमीन यासह 6.07 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.
जप्त केलेल्या जंगम मालमत्तेमध्ये 38.8 लाख रुपयांची वाहने आणि 18 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने यांचा समावेश आहे. सहसंचालक राजशेखर बिजापूर यांनी उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा अधिक माया जमवल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यामुळे लोकायुक्त पोलिसांकडून सदर कारवाई करण्यात आली.
यासाठी धारवाडचे लोकायुक्त पोलीस अधीक्षक एस. टी. सिद्धलिंगप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. छाप्याच्या कारवाईनंतर लोकायुक्तांनी राजशेखर बिजापूर यांच्या विरोधात धारवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
लोकायुक्त पथक निवासस्थानामध्ये प्रवेश करण्यापूर्वी बिजापूर यांनी तब्बल 50,000 रुपयांची रोकड कमोडमध्ये टाकून फ्लश केल्याचा आरोप आहे.


