बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या श्रीधर माळगी याची जलतरण क्षेत्रातील असाधारण कामगिरी, अढळ समर्पण आणि उल्लेखनीय वचनबद्धतेची दखल घेत कर्नाटक सरकारने त्याला राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘एकलव्य पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार समारंभात श्रीधर याला सदर सन्मान प्रदान केला.
कर्नाटक सरकारकडून क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी ‘एकलव्य पुरस्कार’ हा एक आहे. स्विमर्स क्लब बेळगाव आणि अॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावचा सदस्य श्रीधर याने दिव्यांग असूनही आपल्या असाधारण जलतरण कौशल्याच्या जोरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
भारतीय संघातून दिव्यांगांच्या 12 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या श्रीधर माळगी याने 19 आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरील10 स्पर्धांमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व करत 57 पदकांची लयलूट केली आहे.
श्रीधर याचा प्रवास तेंव्हा सुरू झाला जेंव्हा जलतरण गुरु उमेश कलघटगी यांनी त्यांची क्षमता ओळखली आणि त्यांना पोहण्यास प्रोत्साहित केले. सुरुवातीला खर्च कसा भागवायचा याची काळजी करणाऱ्या आपल्या पालकांच्या भक्कम पाठिंब्यामुळे श्रीधर याने 2012 मध्ये कलघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू केले. जेथून त्याच्या असाधारण क्रीडा कारकिर्दीची सुरुवात झाली.
सध्या श्रीधर बेळगाव येथील झी स्विम अकादमी आणि सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलाव (ऑलिंपिक आकार), बेळगाव येथे प्रशिक्षण घेतो. जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी आणि शरथ एम. गायकवाड (ऑलिंपिक आणि अर्जुन पुरस्कार विजेते) यांच्या मार्गदर्शनाखाली तो सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी 3 तास जलतरणाचा सराव व कठोर प्रशिक्षण घेतो. त्याच्या प्रतिभेची गोस्पोर्ट्स फाउंडेशननेही दखल घेतली असून त्याच्या क्रीडा उपक्रमांना महत्त्वपूर्ण पाठिंबा दिला आहे.
श्रीधर माळगी याला केएलई सोसायटी अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशन अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, एसएलके ग्रुप बेळगाव, राम मल्ल्या, अलाइड फाउंडर्स बेळगाव, पॉलीहायड्रॉन फाउंडेशन, डॉ. नितीन खोत, रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानेक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडोलकर, डॉ. राजेंद्र भांडणकर आणि इतर अनेक मान्यवरांचे प्रोत्साहन आणि पाठिंबा लाभत आहे. श्रीधर माळगी याला एकलव्य पुरस्काराने सन्मानित करणे ही त्यांच्या अदम्य वृत्तीचे, कठोर परिश्रमाचे आणि उत्कृष्टतेच्या अपवादात्मक प्रयत्नाचे प्रतीक असून जे उदयन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.





