बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील आरपीडी क्रॉस येथील ड्रेनेजची समस्या गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर बनली असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. चार दिवसांपूर्वी याठिकाणचे ड्रेनेजचे तुटलेले झाकण बदलण्यात आले असले, तरी चोकअप झालेल्या गटारींमधून सांडपाणी आजही रस्त्यावर येत आहे.
या परिसरातील ड्रेनेजचे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असून सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. ड्रेनेजमधील कचरा आणि घाण रस्त्यावर पसरल्याने पादचारी तसेच वाहनधारकांना याच सांडपाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. दुर्गंधी इतकी प्रचंड आहे की, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाला तोंडाला रुमाल लावून प्रवास करावा लागत असल्याची भीषण स्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ड्रेनेज वाहिनी तुडुंब भरून वाहत आहे. या संदर्भात अनेकवेळा तक्रारी आणि निवेदने देऊनही त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. तक्रार केल्यावर प्रशासन केवळ तात्पुरती दुरुस्ती करते आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते, अशी माहिती एका स्थानिक व्यापाऱ्याने दिली. या दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून अनेकांना उपचारासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे व्यवसायावरही याचा परिणाम होत असल्याने ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी आर्त विनंती व्यापाऱ्यांनी केली आहे.

आरपीडी कॉर्नर हा भाग अत्यंत गजबजलेला असून येथे आरपीडी आणि जीएसएस सारखी नामांकित महाविद्यालये तसेच विविध व्यावसायिक संस्था आहेत. विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या या भागात दररोज दुर्गंधी आणि सांडपाण्यातून वाट काढावी लागत आहे. बेळगावला स्मार्ट सिटी म्हणून मिरवले जात असताना आणि कोट्यवधी रुपये खर्च झाले असताना, ही प्राथमिक समस्या सुटू नये याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. स्मार्ट सिटीचा निधी नेमका कुठे खर्च झाला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पूर्वी हे कामकाज सॅनिटरी इन्स्पेक्टर पाहत होते, मात्र महापालिकेने हे कंत्राट खासगी संस्थेला दिल्याने हा विभाग आता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग झाला आहे. संबंधित कंत्राटदार आणि त्याचे कर्मचारी अत्यंत उद्धटपणे उत्तरे देतात, तसेच कामासाठी पैशांची विचारणा करतात, असा आरोप माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी केला आहे.
महानगरपालिकेने आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ड्रेनेजची समस्या तातडीने मार्गी लावावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.




