बेळगाव लाईव्ह : उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक यांच्यातील प्रादेशिक असमतोल मुळापासून उपटून टाकण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असून, या भागातील आरोग्य आणि शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.
बेळगावच्या सुवर्ण विधानसभा सौधमध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या सांगता सभेत ते बोलत होते. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम देत, “आताही मीच मुख्यमंत्री आहे आणि पुढेही मीच राहणार,” अशा शब्दांत त्यांनी आपला बालेकिल्ला राखला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांच्या तातडीच्या निधीसह अनेक मोठ्या घोषणा केल्या. नंजुडाप्पा आणि गोविंदराव समितीच्या शिफारसींनुसार मागास तालुक्यांचा विकास करण्यासाठी राज्य सरकार विशेष कृती आराखडा राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेषतः सिंचन प्रकल्पांवर भाष्य करताना, महादायी आणि अप्पर कृष्णा योजनेसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या पर्यावरण परवानग्या आणि निधीतील अकार्यक्षमतेवर त्यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. राज्यातील हक्काच्या पाणी वाटपासाठी केंद्राकडे आग्रही मागणी करण्याचा ठरावही यावेळी सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरणही चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. “काँग्रेस हायकामांडचा मला पूर्ण पाठिंबा आहे,” असे सांगत सिद्धरामय्या यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले, ज्यामुळे नेतृत्व बदलाच्या चर्चांना तूर्तास ब्रेक लागला आहे.
सभापती यू.टी. खादर यांनी 58 तासांच्या विक्रमी कामकाजाची आणि 23 महत्त्वपूर्ण विधेयके मंजूर झाल्याची माहिती दिली. कल्याण कर्नाटकसाठी 5 हजार कोटींचा निधी आणि रिक्त पदे भरण्याच्या सूचना देऊन, राष्ट्रगीताच्या सुरांनी या यशस्वी अधिवेशनाची सांगता झाली.
खेड्यापाड्यात पोहोचणार डॉक्टर आणि औषधे
दुर्गम गावांसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ८१ फिरत्या आरोग्य पथकांचे लोकार्पण
बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या सुवर्णसौध परिसरात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आरोग्य विभागाच्या ‘आरोग्य संचारी’ या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेचे उद्घाटन केले. दुर्गम भाग, डोंगरदऱ्या आणि जिथे पोहोचण्यासाठी साधे रस्तेही उपलब्ध नाहीत अशा गावांतील नागरिकांना तात्काळ उपचार मिळावेत, या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी फिरत्या आरोग्य पथकांचे लोकार्पण केले. राज्यातील प्रत्येक शेवटच्या घटकाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
या नवीन उपक्रमांतर्गत एकूण ८१ फिरत्या वाहनांचा ताफा राज्याच्या सेवेत रुजू झाला असून, त्याचे समसमान वाटप करण्यात आले आहे. यामध्ये उत्तर कर्नाटकसाठी ४१ आणि दक्षिण कर्नाटकसाठी ४० वाहनांची सोय करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी या योजनेची रूपरेषा मांडताना सांगितले की, भौगोलिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना मैलाचा दगड ठरेल.
या सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ज्या सामान्य जनतेला आजवर वेळेवर उपचार मिळत नव्हते, त्यांच्यापर्यंत आता सरकार स्वतःहून पोहोचणार आहे. विशेषतः गरीब, वनवासी आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या बांधवांना वेळेवर दर्जेदार उपचार मिळवून देणे हेच आमच्या सरकारचे मुख्य ध्येय आहे, असे त्यांनी म्हटले. राज्यातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुदृढ राहावे हीच आमची सदिच्छा आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संकल्प बोलून दाखवत जनतेला या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.


