बेळगाव लाईव्ह : कोणताही धर्म द्वेषाची शिकवण देत नाही, कारण प्रेम आणि करुणा हाच सर्व धर्मांचा गाभा आहे, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज केले. बेळगावातील चर्च मुख्यालयाला त्यांनी भेट दिली, जिथे बिशप डेरेक फर्नांडिस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, धर्मनिरपेक्ष समाज निर्मितीसाठी आपल्या संविधानाने अधिक भर दिला आहे आणि आपली शिक्षण व्यवस्था या मूल्यांना पूरक असायला हवी. देशात विविध जाती-धर्माचे लोक असले तरी सर्वांनी एकोप्याने आणि सलोख्याने राहण्याची नितांत आवश्यकता आहे.
“माणसाने माणसावर प्रेम करणाऱ्या मानवतावादी समाजाची निर्मिती आपल्याला करायची आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. समान संधी देणारा, समाजवादाचा पुरस्कार करणारा समाज निर्माण करण्याच्या दिशेने सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. विशेषतः, ख्रिस्ती समुदाय या दिशेने जे कार्य करत आहे, ते कौतुकास्पद आहे. काही मूठभर स्वार्थी लोक मात्र समाजात द्वेष पसरवण्याच्या कामात गुंतलेले आहेत, अशी टीका त्यांनी केली. प्रत्येकाने प्रेम आणि करुणा हाच सर्व धर्मांचा गाभा आहे हे समजून घेतले पाहिजे.
यावेळी त्यांनी सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान आर्चबिशप डेरेक फर्नांडिस, मंत्री के. जे. जॉर्ज, भैरती सुरेश, विधानसभेचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण, विधान परिषद सदस्य आयव्हान डिसोझा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




