बेळगाव लाईव्ह: बेळगाव येथील सुवर्ण सौधमध्ये झालेल्या कर्नाटक मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग -48 शी अशोक सर्कल, संगोळी रायण्णा सर्कल आणि राणी चन्नम्मा सर्कल मार्गे धर्मवीर संभाजी महाराज सर्कलला जोडणाऱ्या उन्नत मार्ग/स्तर विभाजकाच्या (एलिव्हेटेड कॉरिडॉर) बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाला ही मंजुरी 275.53 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चासह देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या टिप्पणीनुसार, हा उन्नत मार्ग 2.03 कि.मी लांबीचा असणार असून शहराच्या मुख्य भागातील वाहतूक कोंडी कमी करणे हा त्याचा मुख्य उद्देश असेल. हा प्रकल्प बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेण्यात येत आहे.
तथापि हुबळीस्थित व्हीएलएस कन्सल्टंट्सने यापूर्वी तयार केलेल्या आराखड्यानुसार, प्रस्तावित उड्डाणपुलाची मुख्य मार्गिका संकम हॉटेलपासून धर्मवीर संभाजी सर्कल (बोगारवेस) पर्यंत सुमारे 3.6 कि.मी. लांबीची आहे, तर जोडणाऱ्या मार्गांसह संपूर्ण कॉरिडॉर सुमारे 4.5 कि.मी. लांबीचा असून, तो अशोक सर्कल आणि संगोळी रायण्णा सर्कल मार्गे कित्तूर राणी चेन्नम्मा सर्कलला एनएच-48 शी जोडतो.
या रचनेत 18 मीटर रुंदीच्या डेकसह चौपदरी उन्नत संरचनेची कल्पना करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या 2.03 कि.मी. लांबीमध्ये आणि पूर्वीच्या डीपीआरमधील अंदाजामध्ये असलेला फरक प्रकल्पाच्या सविस्तर अंमलबजावणी आणि निविदा प्रक्रियेच्या टप्प्यांमध्ये स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.




