बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या सुवर्णसौध येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला अवघे सहा दिवस बाकी असल्याने, पूर्वतयारीला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. आज बेळगाव जिल्हा प्रशासनाने या तयारीचा सखोल आढावा घेतला.
आज बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद आणि शहर पोलीस आयुक्त भूषण बोरासे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पूर्वतयारीची पाहणी केली.
अधिवेशनासाठी लोकप्रतिनिधींच्या निवासासाठी शासकीय निवासस्थाने, सर्किट हाऊससह ३००० खोल्या निश्चित करण्यात आल्या आहेत, तर सुमारे ७०० वाहने तैनात केली आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने ७ ते ८ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
भोजनाची व्यवस्था खास उत्तर कर्नाटकच्या शैलीत केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने साडेचार कोटी रुपये खर्चून साकारलेल्या एका विशाल उद्यानाचे आणि कारंज्याचे लोकार्पण अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

या हिवाळी अधिवेशनातून उत्तर कर्नाटकच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. यंदा सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तसेच दुष्काळ निवारणावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची तयारी दर्शवली आहे.अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णसौधच्या तीन किलोमीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, निदर्शने आणि धरणे यासाठी दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
आंदोलनाचे स्वरूप कळवून परवानगी घेणाऱ्यांनाच निदर्शने करण्याची संधी दिली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ‘महामेळाव्या’ला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही. कायदा मोडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.


