बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात रस्ते सुरक्षा समिती आणि पोलीस मुख्यालयाने दिलेल्या निर्देशांनुसार पोलीस आयुक्तालयामार्फत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईअंतर्गत नियम मोडणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जात आहेत.
दिनांक २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत शहराच्या विविध भागांत ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या एका आठवड्यात मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या एकूण १०७ दोषी चालकांविरुद्ध गुन्हे नोंदवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
शहरात अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाणार आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील प्रमुख चौक आणि संवेदनशील मार्गांवर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून तळीरामांवर कडक नजर ठेवली जात आहे.
वाहनचालकांनी मद्यपान करून वाहने चालवू नयेत आणि वाहतूक नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बेळगाव पोलीस आयुक्तांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.




