बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यात शाकंभरी पौर्णिमेचे वारे वाहू लागले असून, यात्रेनिमित्त तालुक्यातील हजारो भाविक सौंदत्ती यल्लाम्मा डोंगराकडे रवाना होत आहेत. यामध्ये कंग्राळी बी. के. जुने बेळगाव सह विविध गावांतील भाविकांनी आपल्या ग्रामदैवतांचे पूजन करून आणि विधीवत धार्मिक परंपरा पार पाडून सौंदत्तीकडे प्रयाण केले आहे. बेळगाव तालुक्यातील अनेक गावे त्या गावातील भावी काही रवाना झाले आहेत काही भाविक जाणार आहेत आगामी काही दिवस सौंदत्ती चा डोंगर बेळगाव येथील भाविकांनी फुलणार आहे.
तालुक्यातील कंग्राळी बी. के. येथे दर तीन वर्षांनी ही वारी काढण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार, बुधवारी सकाळी गावातील चव्हाटा सर्कल, कलमेश्वर मंदिर, लक्ष्मी मंदिर आणि गणपती मंदिरामध्ये भाविकांनी विधीवत पूजा केली. ‘उदगार’ घालून आणि कापूर प्रज्वलित करून ग्रामदेवतांचा आशीर्वाद घेतल्यानंतर, रेणुका महिला भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात डोंगराकडे मार्गस्थ झाले.
याप्रसंगी देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष मारुती पाटील, मल्लाप्पा पाटील, यल्लाप्पा हारजे, बाळू पाटील, राजू चव्हाण, महादेव पाटील, राजू तलवार आणि चौगुला उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि लक्ष्मी उत्सव कमिटीचे अध्यक्ष जयराम पाटील, अनिल पावशे, नवनाथ पुजारी, उमेश पाटील, दत्ता पाटील यांसह विविध कमिटीचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने हजर होते.

येत्या ३ जानेवारी रोजी शनिवारी शाकंभरी पौर्णिमा असून, या दिवशी सौंदत्ती डोंगरावर मुख्य धार्मिक सोहळा पार पडणार आहे. या यात्रेसाठी बेळगाव तालुक्यातील कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. ६ जानेवारी रोजी मंगळवारी हे सर्व भाविक पुन्हा आपल्या गावात परतणार असून, त्यानंतर गावागावांत पारंपरिक जत्रा साजरी केली जाणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
बसवणकुडची : दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील भाविकांनी सौदत्ती येथील रेणुका एलम्मा देवीच्या दर्शनासाठी भक्तिमय यात्रा सुरू केली आहे. बुधवार, ३१ डिसेंबर रोजी बसवणकुडची येथून सुमारे २,५०० हून अधिक भाविक एकत्रितपणे ५५ टेम्पोंद्वारे एलम्मा देवीच्या डोंगराकडे रवाना झाले.
नवस आणि विशेष पूजा
देवीचे दर्शन घेतल्यानंतर येत्या शनिवारी एलम्मा देवीच्या डोंगरावर विशेष पूजा व धार्मिक विधी पार पडणार आहेत. यावेळी भाविक आपापले विविध नवस पूर्ण करतील. देवीला उडी भरणे यासह विविध पूजाविधी श्रद्धा व भक्तिभावाने पार पाडले जातील.
तळ्याजवळ मुक्काम व परतफेर
यात्रा पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी भाविकांचा ताफा पुन्हा बसवणकुडची येथे परतणार आहे. परंपरेनुसार थेट घरी न जाता, त्या दिवशी गावाच्या बाहेरील तळ्याजवळ सर्व भाविक मुक्काम करतील. तेथे देवीची पूजा व शुद्धीकरणाचे विधी पूर्ण केल्यानंतर पवित्र भावनेने भाविक आपापल्या घरी जातील.
या संपूर्ण यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी स्वयंसेवक व गावातील ज्येष्ठ नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण संपूर्ण गावात पसरले आहे.




