बेळगाव लाईव्ह : हुबळी तालुक्यातील इनांवीरपूर घडलेल्या दलित गरोदर युवतीच्या ‘गौरव हत्याकांड’ प्रकरणातील आरोपींना थेट फाशीची शिक्षा द्यावी. तसेच राज्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर सरकारी आदेश जारी करावा, अशी मागणी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे अध्यक्ष श्रीकांत मादर व विभाग अध्यक्ष सुनीता मोदगी यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे मुख्यमंत्र्यांकडे धाडण्यासाठी आज बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. हुबळी तालुक्यातील इनांवीरपूर घडलेल्या दलित गरोदर युवतीचे गौरव हत्याकांड हा केवळ एक खून नसून मनुष्य जातीला खाली मान घालावयास लावणारे अमानुष आणि कृरकृती आहे.
आपल्या मनाप्रमाणे जीवनसाथी निवडून जीवन जगू इच्छिणाऱ्या एका सात महिन्याच्या गर्भवती युवतीची तिचे स्वतःचे वडिल आणि संबंधितांनी संगनमताने केलेली हत्त्या मनुष्य जातीला काळीमा फासणारी आहे. संविधानाने दिलेला जीवन जगण्याचा हक्क आणि व्यक्ती स्वातंत्र्य हिरावण्याचा हा प्रकार आहे. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन हुबळी तालुक्यातील इनांवीरपूर घडलेल्या दलित गरोदर युवतीच्या ‘गौरव हत्याकांड’ प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.

तसेच राज्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर सरकारी आदेश जारी करावा, अशा आशयाचा तपशील कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी श्रीकांत मादर सुनिता मोदगी, मिलिंद एहोळे, बसवराज कट्टीमनी, बाळप्पा हरिजन आदींसह कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.




