बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील उर्दू सरकारी शाळा क्र. 2 मधील विद्यार्थी -विद्यार्थिनींना घेऊन स्थानिक अंगणवाडी शिक्षकांनी आज सकाळी उद्या रविवारी आयोजित पोलिओ डोस देण्याच्या उपक्रमासंदर्भात जनजागृती फेरी काढली.
सरकारच्या पोलिओ निर्मूलन मोहिमेअंतर्गत उद्या रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना आणि बाळंतीण महिलांना पोलिओ डोस देण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. या संदर्भात शहरातील उर्दू सरकारी शाळा क्र. 2 च्या सहकार्याने अंगणवाडी शिक्षकांनी आज शनिवारी सकाळी मुलांची प्रभात फेरी काढून शहरात जनजागृती केली.
तेंगीनकेरी गल्ली, आझाद गल्ली, भोवी गल्ली, पांगुळ गल्ली, बागवान गल्ली आणि काकर गल्ली या मार्गावरून काढण्यात आलेली ही सवाद्य जनजागृती फेरी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना आझाद गल्ली येथील अंगणवाडी शिक्षिका प्रतिभा कडोलकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या पोलिओ निर्मूलन मोहिमेंतर्गत उद्या 21 डिसेंबर 2025 रोजी 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना आणि बाळंतीण महिलांना पोलिओ डोस दिला जाणार आहे. याची नोंद घेऊन बालकांच्या आणि आपल्या हितासाठी संबंधित महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
तसेच उद्याच्या पोलिओ डोस उपक्रमासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी तेंगीनकेरी गल्ली येथील उर्दू शाळा क्रमांक 2 च्या सहकार्याने तेथील मुलांना घेऊन आम्ही अंगणवाडी शिक्षकांनी आज या प्रभागात जनजागृती फेरी काढली, अशी माहिती त्यांनी दिली. भोई गल्ली येथील अंगणवाडी शिक्षिका सुरेखा हट्टीहोळी यांनी देखील यावेळी पोलिओ डोस उपक्रमाची माहिती देऊन संबंधित सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.


