बेळगाव लाईव्ह : सुमारे शंभर वर्षांपूर्वी, २ फेब्रुवारी १९२५ रोजी, सात उत्साही तरुणांनी एकत्र येऊन शैक्षणिक कार्यासाठी आपली सेवा समर्पित करण्याचा निर्णय घेऊन एका भाड्याच्या इमारतीमध्ये ‘मॉडेल इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. बेळगावच्या सार्वजनिक जीवनातील सहा प्रमुख मार्गदर्शकांनी (प्रमोटर्सनी) या सात तरुण शिक्षकांना त्यांच्या या उदात्त कार्यात प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि संपूर्ण पाठबळ दिले.
डी.व्ही. बेळवी यांच्या अध्यक्षतेखालील या सहा प्रमोटर्सनी बेळगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि नंतर १९४६ मध्ये तिची नोंदणी झाली. या संस्थेचा शतक महोत्सव येत्या 20 ते 26 डिसेंबर पर्यंत भव्य कार्यक्रमाने साजरा करण्यात येत आहे”अशी माहिती बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी पत्रकारांना दिली.
ते पुढे म्हणाले की,” ही छोटी ‘मॉडेल इंग्लिश मीडियम’ संस्था वाढत गेली आणि तिचे रूपांतर आज सात पूर्ण विकसित शाळांमध्ये झाले आहे त्यामध्ये
१.बी.के. मॉडेल हायस्कूल (१९२५)
२.उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूल (१९६७)
३. एन.एस. पै प्री. प्रायमरी आणि प्रायमरी स्कूल (१९९२)
४.वासुदेव घोटगे मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल (२००५)
५.विठ्ठलाचार्य शिवणगी प्री. प्रायमरी आणि प्रायमरी स्कूल (२०१०)
६. मॉडेल सायन्स अँड कॉमर्स पी.यू. कॉलेज (२०१३)
७.श्रीदेवी दासाप्पा शानभाग मॉडेल प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल (२०१६) या सात शाळांचा समावेश आहे.
” विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेल्यामुळे, संस्थेचे अध्यक्ष श्री. डी.व्ही. बेळवी यांनी शाळेसाठी आपली पाटील गल्ली येथील इमारत देऊ केली. पुढे त्यांनी ती इमारत आणि १.५ एकर जमीन संस्थेला अत्यंत वाजवी किमतीत विकली. आणखी एक प्रमोटर श्री. बळवंतराव दातार हे केंद्रामध्ये गृहमंत्री असताना बेळगाव कॅन्टोनमेंट येथील ३.७५ एकर संरक्षण विभागाची जमीन मिळवण्यासाठी मदत केली. देणगीदार आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे दोन्ही ठिकाणी शाळांच्या इमारती उभारण्यात आल्या.
या २ अनुदानित आणि इतर शाळांमधील शिक्षकांच्या समर्पित सेवेचे फलित म्हणजे, या शाळेचे विद्यार्थी आज देशाच्या विविध भागात कार्यरत असून त्यापैकी काहीजण आय ए एस अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ, यशस्वी व्यावसायिक, उद्योजक, पोलीस आणि सरकारी अधिकारी म्हणून उच्च पदांवर कार्यरत आहेत.
या चार संस्थांमध्ये आजही शिक्षणाचे माध्यम केवळ कन्नड आणि मराठी या स्थानिक भाषांमध्ये आहे, हे विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते”
” माजी विद्यार्थी संघटना, स्काऊट्स, एनसीसी, अटल लॅब आणि क्रीडा मंडळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
बी.के. मॉडेल हायस्कूल आणि बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे शताब्दी वर्ष साजरे करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे अशी माहिती यावेळी मार्ग सचिव श्रीनिवास शिवनगी यांनी दिली.
श्री पोतदार पुढे म्हणाले की “हा शताब्दी महोत्सव म्हणजे शिक्षण क्षेत्रातील एक गौरवशाली परंपरा आहे.२० डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत रोज सायंकाळी ५.३० वाजता भरगच्च अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.” त्यामध्ये
*१९ डिसेंबर ला सुप्रसिद्ध विनोदी कलाकार श्री. गंगावती प्राणेश हे विनोदी कार्यक्रमातून उपस्थितांचे मनोरंजन करतील.
२० डिसेंबरला सकाळी ७:३० वा बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व संस्थांचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासह भव्य प्रभात फेरी काढण्यात येईल.
शताब्दी महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमांना शनिवार, २० डिसेंबर रोजी सायं. ५:३० वा. सुरुवात होईल. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. खासदार श्री. तेजस्वी सूर्या यांनी आपली संमती दिली आहे.
*२१ डिसेंबरला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा पुनर्मिलन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विद्यमान केंद्रीय मंत्री श्री. प्रल्हाद जोशी आणि शाळेचे माजी विद्यार्थी व लिंगराज कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य श्री. बसवराज जगजंपी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
*२२ डिसेंबरला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
*२३ डिसेंबरला बेळगाव शहरातील १० उच्च बॉडी बिल्डर्सचा रोमांचक बॉडीबिल्डिंग शो आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर, शाळेचे माजी विद्यार्थी श्री. अथणी यांचा संगीत कार्यक्रम सादर होईल
*२४ डिसेंबरला सुप्रसिद्ध मराठी कलावंत श्री. सचिन पिळगावकर हे कार्यक्रमाला उपस्थित राहून मनोरंजक कार्यक्रम सादर करतील.
*२५ डिसेंबरला विख्यात दिग्दर्शक, टीव्ही आणि सिने-अभिनेते डॉ. गिरीश ओक हे प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवतील, त्यानंतर एक आकर्षक मनोरंजन कार्यक्रम होईल.
दरम्यान विविध क्षेत्रात प्रगती साधलेले शाळेचे माजी विद्यार्थी येऊन कार्यक्रम साजरा करणार आहेत.

*२६ डिसेंबरला शताब्दी महोत्सवाचा समारोप सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक श्री. नागतीहळी चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत होईल.
या सर्व कार्यक्रमांमध्ये फक्त २१डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आहे. आजवर पंधराशे माजी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले असून कार्यक्रमास रोज सुमारे 3000 लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे असेही ते म्हणाले.
या शतक महोत्सवासाठी खासदार जगदीश शेट्टर, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी ताई हेंबाळकर व महसूल मंत्री श्री कृष्णा बायरेगौडा आदि मान्यवरही पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या संस्थेच्या आजी- माजी विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहनही अध्यक्ष श्री अविनाश पोतदार यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेच्या वेळेला उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी, सहसचिव अरविंद हुनगुंद, शतक महोत्सव समितीचे चेअरमन कृष्णकुमार पै, सचिव शैलात चाटे, सहसचिव रवी घाटगे मुख्याध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


