बेळगाव लाईव्ह : अथणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले खरे, पण या कार्यक्रमात मराठा समाजाचे नेते आणि राज्याचे मंत्री संतोष लाड यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्याचे मंत्रीपद हे मराठा समाजाच्या पाठिंब्यामुळे मिळाले असताना, त्यांनी केलेली विधाने अत्यंत अशोभनीय असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केली आहे.
मंत्री संतोष लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम समाज अधिक होता, तसेच अफजल खानाचा वध करताना वापरलेली वाघनखे मुस्लिमांनी बनविलेली होती, असे अत्यंत चुकीचे वक्तव्य केले. शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास पसरविणे हे मंत्री लाड यांना अशोभनीय आहे.
बेनके यांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे की, हा कार्यक्रम राजकीय होता का? मंत्री लाड यांचे हे विधान मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण सुरू असल्याचे दर्शवते का, कारण असा इतिहास मांडणे हे मराठा समाजासाठी घातक आहे अशी टीका अनिल बेनके यांनी केली.
यासोबतच, शिवरायांची प्रार्थना सुरू असताना व्यासपीठावरून खाली उतरणे हे निंदनीय असून, मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधाने करणे संतोष लाड यांच्यासाठी अशोभनीय आहे. त्यांनी मराठा समाजाबद्दल आदर ठेवावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याग, बलिदान आणि शौर्याची जाण ठेवायला हवी.
संतोष लाड यांचे विधान अवमानकारक आहे; यातून त्यांना काय साध्य करायचे आहे, असा सवाल बेनके यांनी विचारला आहे. मराठा समाजाच्या वतीने संतोष लाड यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत, भविष्यात अशी विधाने केली तर मराठा समाजाकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशारा अनिल बेनके यांनी दिला आहे.


