बेळगाव लाईव्ह :अनगोळ, बेळगाव येथील होतकरू शरीर सौष्ठवपटू विनोद पुंडलिक मेत्री याची जर्मनी येथे होणाऱ्या ‘मिस्टर युनिव्हर्स -2025’ या जागतिक पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय चमूत अभिनंदनीय निवड झाली आहे.
अनगोळ येथील रहिवासी दिवंगत पुंडलिक मेत्री यांचा चिरंजीव असलेल्या विनोद याला व्यायाम आणि तंदुरुस्तीच्या बाबतीत वडिलांचे नेहमीच प्रोत्साहन लाभले. विनोद याचे शालेय शिक्षण अनगोळ येथील संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण आरपीडी कॉलेज येथे झाले. आरपीडी ‘कॉलेज श्री’ किताब पटकावणारा विनोद सुवर्णपदक मिळवत महाविद्यालयीन जीवनातील प्रतिष्ठेच्या ‘युनिव्हर्सिटी ब्लू’ किताबाचा मानकरी देखील ठरला होता. प्रारंभीच्या काळात आणि त्यानंतरही राजेश लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद याने शरीरसौष्ठव क्रीडा क्षेत्रात स्पृहणीय यश संपादन केले. या यशाच्या जोरावरच स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत तो भारतीय सैन्य दलात दाखल झाला. आता विनोद हा मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे ऑन ड्युटी हवालदार या पदावर कार्यरत आहे.
‘मिस्टर युनिव्हर्स -2025’ या जागतिक पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या विनोद पुंडलिक मेत्री याला बेळगांव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्सचे सर्व पदाधिकारी व एसएसएस फाउंडेशनचे संस्थापक संजय सुंठकर यांच्यासह मिहिर पोतदार व महेश सातपुते यांचे मोलाचे प्रोत्साहन, मार्गदर्शन लाभत आहे. जागतिक स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल विनोद याचे सध्या सर्वत्र अभिनंदन होत आहे.



