बेळगाव लाईव्ह : राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, पोलीस विभागाकडून वाहतूक ई-चलान अंतर्गत नोंद झालेल्या व भरणा न केलेल्या दंडाच्या रकमेवर ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील नागरिकांना ही सवलत योजना २१ नोव्हेंबर २०२५ पासून १२ डिसेंबर २०२५ पर्यंत लागू असणार आहे, त्यामुळे या मर्यादित संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य सरकारने पोलीस विभागाकडून वाहतूक ई-चलानखाली नोंद झालेल्या आणि प्रलंबित असलेल्या दंडाच्या रकमेवर ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
हा आदेश २१.११.२०२५ पासून १२.१२.२०२५ पर्यंत अमलात राहील. त्यामुळे बेळगाव शहरातील नागरिकांनी आपल्या वाहनांवरील थकीत दंडाच्या रकमेच्या ५० टक्के भरणा करून, संबंधित प्रकरणे निकाली काढावीत.
थकीत दंडाची रक्कम भरण्यासाठी अनेक केंद्रे उपलब्ध आहेत. नागरिक त्यांच्या जवळच्या वाहतूक पोलीस ठाण्यात थकीत दंडाचा भरणा करू शकतात. तसेच, पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयातही दंड स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
बेळगाव वन किंवा कर्नाटक वन केंद्रांवर देखील थकीत दंडाचा भरणा करता येईल. या केंद्रांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत: अशोक नगर, दूरदर्शन नगर (टी.व्ही. सेंटर), रिसालदार गल्ली (जुनी कॉर्पोरेशन इमारत) आणि गोवावेस. याव्यतिरिक्त, वाहतूक विभागाचे ई-चलान मशीन असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक (ए.एस.आय.) किंवा त्याहून वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे दंड भरून त्याची रीतसर पावती मिळवता येईल. नागरिकांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी नमूद केले.


