बेळगाव लाईव्ह : गेल्या 69 वर्षापासून बेळगाव सह सीमा भागातील मराठी भाषिक लोकशाही मार्गातून आंदोलन करत काळा दिनी महाराष्ट्रात देण्यात सामील होण्याचा निर्धार व्यक्त करत आलेत.
केवळ मराठी अस्मितेसाठी मराठी भाषिकांकडून काळा दिन पाळला जातो आणि निषेध खिरीत महाराष्ट्रात सामील होण्याच्या मराठी अस्मितेच्या भावना मराठी भाषिकांकडून मांडल्या जातात असे असताना अथणीचे विद्यमान आमदार आणि कर्नाटकचे माजी मंत्री लक्ष्मण सवदी यांनी पुन्हा एकदा मराठी भाषिकांना जीवनाचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीवर टीका करताना आमदार लक्ष्मण सवदी यांनी केलेले बेताल वक्तव्य आणि लावलेला ‘जावईशोध’ यामुळे मराठी भाषकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सीमाप्रश्न आणि सीमालढ्याबाबत सवदी पूर्णपणे अनभिज्ञ असल्यामुळेच ते अशी वक्तव्ये करत असल्याची टीका मराठी भाषिक करत आहेत.
शनिवारी अथणी येथे माध्यमांशी बोलताना आमदार सवदी यांनी म. ए. समितीने बेळगावची मागणी थांबवावी, अन्यथा मुंबई कर्नाटकात सामील करण्याची मागणी करू, असे बेताल विधान केले. यासोबतच, म. ए. समिती ‘भाडोत्री कार्यकर्त्यांना’ जमवून ‘काळा दिन’ पाळते, असा ‘जावईशोध’ त्यांनी लावला.
सवदींच्या या वक्तव्यावर मराठी भाषकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. म. ए. समिती भाडोत्री कार्यकर्ते आणत नाही, तर याउलट राज्य शासन जो निधी देते, त्या निधीतून कन्नड भाषिक कार्यकर्ते बेळगावमध्ये येऊन धुडगूस घालतात. मराठी भाषिक स्वखर्चातून, पदरमोड करून कळकळीने सीमालढा लढत आहेत.
सरकारी निधी किंवा भाडोत्री पैशांवर येऊन मराठी भाषिक कधीच धुडघूस घालत नाहीत. शांततेच्या मार्गाने आणि लोकशाही मार्गाने आजवर सीमावासीयांनी हा लढा जिवंत ठेवला असून फुकटच्या शासकीय निधीवर कोण बेळगावात येऊन शांतता बिघडवते, याचा अंदाज सवदींना नाही. केवळ प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी सवदी अशा प्रकारची बेताल वक्तव्ये करून ते ‘बरळत’ आहेत अशी टीका मराठी भाषिक करत आहेत.


