बेळगाव लाईव्ह :घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी आपले कार्यक्षेत्र आता मानवी शरीराला जगाचा निरोप घ्यावयास लावणाऱ्या स्मशानभूमीपर्यंत विस्तारल्याची प्रचिती नुकतीच सांबरा (ता. जि. बेळगाव) येथे आली. सांबरा स्मशान भूमीतील चक्क शवदाहिनीच चोरट्यांनी लंपास केल्यामुळे परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे.
सांबरा गावासाठी असलेल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार आणि त्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी मोठे दोन शेड उभारून त्या ठिकाणी भिडाच्या शवदाहिन्या बसवण्यात आल्या होत्या. तथापि गेल्या कांही दिवसात यापैकी एका शेडमधील संपूर्ण शवदाहिनी चोरट्यांनी लांबवली आहे.
गावातील नागरिक एका अंत्यसंस्कारासाठी गेले असता सदर खळबळजनक प्रकार घडकीस आला. चोरट्यांनी शवदाहिनीची एक बाजू सोडल्यास उर्वरित संपूर्ण दाहिनीच उखडून लंपास केली आहे. चोरट्यांनी दुसऱ्या शेडमध्ये असलेल्या शवदाहिनीचेही नुकसान केले असून तिचाही कांही भाग लंपास केला आहे.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच अलीकडच्या काळात सांबरा ग्रामपंचायतकडून स्मशानभूमीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच हा प्रकार घडला असल्याचा आरोप केला जात आहे.
स्मशानभूमीतील शवदाहिनी चोरट्यांनी लांबवल्यामुळे सध्या गावकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पूर्वीप्रमाणे चिता रचून अथवा चोरट्यांनी शिल्लक ठेवलेल्या एकाच शवदाहिनीवर अंत्यसंस्कार उरकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सांबरा गावाची सदर स्मशानभूमी ही बेळगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या व्याप्तीत येते. कांही केले तरी विस्तारीकरण झाल्यानंतर आपली स्मशानभूमी इतिहास जमा होणार आहे, असा विचार करून तर आपली ग्रामपंचायत स्मशानभूमीकडे दुर्लक्ष करत नाही ना? अशी शंका गावकऱ्यांना भेडसावू लागली आहे.
जर तसे काही नसल्यास शवदाहिनी चोरी प्रकरणाची ग्रामपंचायतीने गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. तसेच चोरीला गेलेल्या शेवदाहीनीच्या ठिकाणी युद्धपातळीवर नवी शवदाहिनी बसवावी. पोलीस प्रशासनाने देखील याप्रकरणी लक्ष घालून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे


