बेळगाव लाईव्ह :एका मोस्ट वॉन्टेड गुंडाने त्याला अटक करण्यासाठी आलेल्या तीन पोलिसांवर हल्ला केल्याची नाट्यमय घटना दोन दिवसांपूर्वी बेळगावमधील एका बारसमोर घडली.
सदर हल्ल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीची ओळख पटली असून तो मंगळुरूचा कुख्यात गुन्हेगार आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासबागमधील व्होडका बारजवळ आरोपीने अटकेला हिंसक प्रतिकार केल्याने पीएसआय राजशेखर वंडाली, पीएसआय सिद्धप्पा गुडी आणि यल्लापूर पोलिस ठाण्याचे चीफ कॉन्स्टेबल महंमद शफी शेख जखमी झाले.
आरोपीने मारामारी करून अधिकाऱ्यांवरच हल्ला केला नाही तर स्वतःलाही जखमी करून घेतल्याची माहिती मिळाली आहे. शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




